ग्वाल्हेर – कोरोनाग्रस्त विवाहित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिला रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर कृत्रिम श्वासोच्छवास करत होती. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये विकृतीचा कळस पाहायला मिळाला. आरोपी वॉर्डबॉयला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या कोव्हिड सेंटरमध्ये हा प्रकार घडला. कोरोनाची लागण झाल्यानंतर संबंधित विवाहितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने तिला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं.
शनिवारी रात्री विवेक लोधी नावाचा वॉर्डबॉय महिलेच्या कक्षात आला. महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या खोलीत कोणीही नव्हतं. याचा गैरफायदा घेत वॉर्डबॉयने महिलेसोबत गैरकृत्य करण्यास सुरुवात केली, अशी तक्रार पीडितेच्या मुलाने केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महिलेला याची जाणीव होताच तिने वॉर्डबॉयवर ओरडण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात तो खोलीतून निसटला. त्यानंतर महिलेने मुलाला फोन करुन घडलेली हकिगत सांगितली. मुलगा आपल्या नातेवाईकांना घेऊन रुग्णालयात दाखल झाला. मुलाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी वॉर्डबॉय विवेक लोधी याच्याविरोधात कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. पीडित महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वॉर्डबॉयची चौकशी सुरु केली आहे.






