पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुरंदर तालुक्यातील कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्यामुळे शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी प्रशासनाला धारेवर धरल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना तोंड देताना अगोदरच मेटाकुटीस आलेल्या ठाकरे सरकारची आणखीनच कोंडी झाली आहे.
ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी लसीकरण, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरबाबत पुरंदर जिल्ह्याशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला. तसेच ही परिस्थिती लवकर न सुधारल्यास आपण रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या पुरवठ्यासाठी ठिय्या आंदोलन करु, असा इशाराही शिवतारे यांनी दिला.
माझी भूमिका ही महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात नाही. मी प्रशासनावर नाराज आहे. जिल्हाधिकारी, FDA यांच्या कामावर माझा आक्षेप आहे. पुरंदर जिल्ह्यात कोरोनाचे 1800 रुग्ण असताना केवळ 225 रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळाली. लसीकरणाबाबतही पुरंदर जिल्ह्यासोबत अन्याय झाला, अशी टीका विजय शिवतारे यांनी केली.






