पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पिंपरी शहरातील ओटास्कीम भागात दिवसाढवळ्या झालेल्या गँगवॉरने पिंपरी-चिंचवड पुन्हा एकदा हादरलं आहे. सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. या घटनेचा बदला घेण्यासाठी म्हणून मंगळवारी दुपारी प्रतिस्पर्धी टोळीने आरोपींच्या मित्रांवर हल्ला केल्याचं कळतंय.
घटनेतील आरोपी सोहेल याला मृत आकाशने ‘काय रे कुठे चाललाय’ असं रागात विचारलं होतं. त्याचा राग मनात धरून तक्रारदार आणि मृत आकाश बोलत थांबलेले असताना सोहेलच्या मित्राने हल्ला चढवत कोयत्याने वार करून आकाशचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहेत.
या घटनेत मृत झालेल्या आकाश उर्फ मोन्या कांबळेच्या खुनाच्या आरोपावरून सोहेल जाधवसह त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत आकाशच्या चिडलेल्या मित्रांनी मारहाण केलेल्या शक्तीमान आणि प्रकाश कांबळेला गाठून त्यांच्यावर सिमेंटचे गट्टू आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. या दोन्ही घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.






