नवी दिल्ली – नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली. यामुळे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना सभागृहात अशा घोषणा देऊ नये, अशी समज दिली. छ. शिवाजी महाराजांच्या जयघोषावर आक्षेप घेतल्यामुळे नवा वाद निर्माण झाला. या वादावरून उपराष्ट्रपतींवरही टीका करण्यात आली. यानंतर आता स्वतः व्यंकय्या नायडू यांनी आपली बाजू मांडली आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रशंसक, तर देवी भवानीचा उपासक आहे. मी त्यांचा अनादर केला नाही, असे स्पष्टीकरण राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिले आहे.
व्यंकय्या नायडू यांनी ट्विटरवरुन आपले स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच प्रशंसक, तर देवी भवानीचा उपासक राहिलो आहे. शपथ घेताना कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत, याची परंपरेनुसार आठवण सभासदांना करुन दिली. अनादर केला नाही. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी या विषयावर ट्विट केले आहे. त्यांनी भाजप आणि संभाजी भिडेंवर टीकास्त्र सोडले आहे. राऊत म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला, की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली, सातारा बंदची अद्याप घोषणा नाही असे म्हणत त्यांनी जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा ट्विटरवरून दिली आहे.







