सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – या जगात माणुसकी शिल्लक आहे की नाही ? असा प्रश्न पडवा अशी घटना तुळजापूरात घडली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांने मृतांच्या नातेवाईकांकडे पाच हजार लाचेची मागणी करुन ती स्वीकारली देखील. हा प्रकार समजताच तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील बामणी येथील बापू गोरख माळी (50) यांना कोरोना झाल्याने त्यांना 20 एप्रिल रोजी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु 23 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे तुळजापूर नगर पालिकेच्या वतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरु झाली. यातील एक कर्मचारी शंकर कांबळे यांनी रुग्णांच्या नातेवाईकांकडे अंत्यसंस्काराचे साहित्य आणेन तसेच तुम्हाला मृताचे तोंड दाखवतो अशी विविध कारणे देत तब्बल पाच हजारांची लाच मागितली. नातेवाईकांकडे पर्याय नसल्याने त्यांनी पाच हजार रुपये संबंधित कर्मचाऱ्यांसह दिलेही. त्यानंतर काल दुपारी साडेचारच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना हा ‘मढय़ाच्या टाळूवरील लोणी खाण्या’चा प्रकार खटकल्याने व आज आपल्यावर ही वेळ आली, इतरांवरही वेळ येवू नये म्हणून त्यांनी तुळजापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱयांकडे यांसदर्भात तक्रार केली. तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत या तक्रारीची शहानिशा केली. यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी शंकर कांबळे यांनी पाच हजाराची मागणी करून रक्कम स्वीकारल्याचे मान्य केल्याने त्याना तत्काळ निलंबित करण्यात आले.
मृत कोरोना रुग्ण बापू गोरख माळी हे मोलमजुरी करून आपला उदरर्निवाह करत होते. त्यातच त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. बापू गोरख माळी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. दरम्यान शंकर कांबळे यांनी मृत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेतलेली पाच हजाराची रक्कम माळी कुटुंबाला परत केली आहे.






