बिजापूर (छत्तीसगड)- नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाची चार दिवसांनी हत्या केली. गंगालर येथे त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला. या पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने आणि भावाने त्यांची विनाशर्थ सुटका करण्याचे आवाहन केले होते. मात्र ते धुडकावून ही हत्या करण्यात आली.
त्यांचा मृतदेह फेकल्याचे समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने तपास सुरू केला. नक्षलवाद्यांनी उपनिरीक्षक मुरली ताती यांच्या मृतदेहाजवळ पत्रके फेकली. त्यात तातीने ग्रामस्थांवर हल्ले केले, महिलांवर अत्याचार केले, असे आरोप करण्यात आले आहेत.
ताती हा दीड महिनापासून रजेवर पालणार या गावी आला होता. तेथील जत्रेत गेल्यावर त्याचे अपहरण करण्यात आले होते. ताती हा शरण आलेला नक्षलवादी होता. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत तो शरण आला. त्याला त्यानंतर पोलीस दलात नोकरी देण्यात आली होती.






