अनिल देशमुखांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता?

anil-deshmukh

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी गुन्हा दाखल केला आणि त्यांच्या मुंबई व नागपूरमधील निवासस्थाने आणि कार्यालयांसह 10 ठिकाणी छापे टाकले. सीबीआयच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सीबीआयने दखलपात्र गुन्हा दाखल केल्याने देशमुख यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असून देशमुख आता अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात धाव घेतात की सीबीआयला सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेनुसार मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून अनिल देशमुख यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी करण्यात आल्याचे सीबीआयने सुरुवातीलाच नमूद केले आहे. आपल्या दिल्ली मुख्यालयाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात सीबीआयने नमूद केले आहे की, प्राथमिक चौकशीनुसार तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्य अज्ञात लोकांनी पदाचा आणि अधिकाराचा गैरफायदा उठवण्याचा प्रयत्न केल्याचा दखलपात्र गुन्हा केल्याचे स्पष्ट होते.

सध्या निलंबित असलेला वादग्रस्त सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेला तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा पोलिस दलात घेतले जात आहे. शिवाय त्याच्याकडे अत्यंत संवेदनशील प्रकरणे तपासासाठी दिली जात आहेत याची पूर्ण कल्पना देशमुख यांना होती, असेही प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याचे सीबीआयने नमूद केले आहे.

सीबीआयने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेचाही उल्लेख केला आहे. पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या आणि त्यांना दिल्या गेलेल्या पदस्थापना तथा पोस्टिंग यात देशमुख यांनी हस्तक्षेप केला आणि पोलिस अधिकार्‍यांच्या कामात अनावश्यक हस्तक्षेप केला, असे परमबीर यांनी म्हटलेले आहे. त्याचीही चौकशी करणार असल्याचे सीबीआय म्हणते. या सर्व पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 2018 सेक्शन 3 आणि भारतीय दंडविधान सेक्शन 120 बी नुसार सीबीआयने आरोप ठेवले आहेत.

सीबीआयने प्राथमिक चौकशीचा अहवाल अद्याप उच्च न्यायालयात सादर केलेला नाही. मात्र, त्यापूर्वीच सीबीआयने दिल्लीमध्ये अनिल देशमुख आणि त्यांच्या अन्य अज्ञात सहकार्‍यांविरोधात एफआयआर नोंदवत गुन्हा दाखल केला.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर केलेल्या 100 कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपावरून सीबीआयने याचिकाकर्त्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्या जबाबाने तपासाला सुरुवात केली. सीबीआयने एनआयएच्या कोठडीत असलेल्या निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्यासह गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि बार मालक महेश शेट्टी यांच्यापाठोपाठ देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे व संजीव पलांडे यांची सीबीआयने कसून चौकशी केली. सर्वात शेवटी सीबीआयने सांताक्रूझ येथील डीआरडीओ गेस्ट हाऊसवर 14 एप्रिलला अनिल देशमुख यांचीही 11 तास चौकशी केली होती. सचिन वाझे आणि अन्य आरोपींच्या घर, कार्यालयातून एनआयएने जप्त केलेली डायरी आणि कागदोपत्री ऐवज सीबीआयने ताब्यात घेतले. नोंदविलेले जबाब आणि सापडलेले पुरावे या आधारे सीबीआयने अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल करण्याचे पाऊल उचलले. आरोपांमध्ये तथ्य असेल तर देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याची मुभा न्यायालयाने सीबीआयला दिली होती. त्यानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here