कोरोनामुळे मैत्रिणीचा मृत्यूने दिली तिला कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्याची प्रेरणा

लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) – कोरोना महामारीच्या सध्याच्या भीषण परिस्थितीमध्ये काही सकारात्मक बातम्याही समोर येत आहेत. कोरोना रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आसपासही कोणी फिरण्यास तयार नसताना लखनऊ मधील 42 वर्षीय वर्षा वर्मा मात्र या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची मोहीम मनापासून राबवत आहे.

संपूर्ण पीपीई किट परिधान करून वर्षा कोविड हॉस्पिटलच्या बाहेर उभी असते. करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णाचे नातेवाईकही अनेक वेळा मृतदेहाचा ताबा घेण्यास समोर येत नाहीत अशा वेळी या मृतदेहावर अंत्यसंस्कार कोणी करायचे हा प्रश्न निर्माण होतो.या प्रश्नाचे उत्तर वर्षा वर्मा यांनी शोधले असून अशा मृतदेहांवर ती अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेत आहे. वर्षा केवळ या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करते असे नाही तर स्वतः शववाहिका चालवून ती हे मृतदेह स्मशानात नेते.

काही दिवसापूर्वी वर्षाच्या मैत्रिणीचा मृत्यू करोनामुळे झाला होता, त्यावेळी तिचा मृतदेह कोणीही ताब्यात घेण्यास तयार नव्हते आणि तिच्यावर अंत्यसंस्कार कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला होता.त्यानंतर वर्षाला या विषयाचे गांभीर्य समजले आणि कोणताही मृतदेह अंत्यसंस्काराविना राहणार नाही यासाठी तिने ही मोहीम सुरू केली आहे. यासाठी तिने एक कार भाड्याने घेतली असून ती स्वतः कार चालवत मृतदेह स्मशानात नेते आणि त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करते. वर्षाची एक कोशिश ऐसी भी या नावाची एक एनजीओ असून या संस्थेच्या माध्यमातून ती हा उपक्रम राबवत आहे तिच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here