नवी दिल्ली – बनारस घराण्याचे प्रसिद्ध गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्र यांचे रविवारी कोरोनाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या सेंट स्टिफन्स हॉस्पिटलात उपचार सुरू होते. या उपचारा दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाने शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. शास्त्रीय गायनाच्या दुनियेत आपली छाप सोडणारे पंडित राजन मिश्र यांच्या निधनाने अत्यंत दुःखी झाल्याचे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. राजन मिश्र आणि त्यांचे बंधू साजन मिश्र हे ख्याल शैलीतील गाण्यांसाठी देशभरात प्रसिद्ध होते. त्यांच्या जोडीला 1971 साली पेंद्र सरकारने संस्कृत अर्वाडने गौरविले देखील होते.
त्याशिवाय गंधर्व पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि 2007 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर 14 डिसेंबर 2012मध्ये त्यांना राष्ट्रीय तानसेन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.






