मोतीचिराई (कच्छ गुजरात) – कोरोनाचा कहर सुरू असलेल्या गुजरातमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यावरून आता ऑक्सिजन सिलिंडर भरण्यासाठी मारामाऱया आणि गोळीबार होत असल्याची धक्कादायक घटना कच्छ जिह्यात घडली.
गावात मंगळवारी रात्री रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर घेऊन नातेवाईक अग्रवाल अॅण्ड कंपनीच्या परिसरात उभे होते. सिलिंडर रिफिल करण्यासाठी मोठी रांग लागली होती. रांग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू होता. यावरून राजभा जडेजा आणि रामदेवसिंग जडेजा या दोन गटांत सुरुवातीला वादावादी, हाणामारी झाली. गाडय़ांची तोडफोड करण्यात आली.
यावरून राजभा जडेजाने आपल्या पिस्तूलमधून जमिनीवर दोन राऊंड फायर केले. यामुळे मोठा गोंधळ उडाला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि काहीजणांना ताब्यात घेतले. आता ऑक्सिजन रिफिल सेंटरबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला असून, ऑक्सिजन वाहतूक करणाऱया टँकर्सनाही पोलीस संरक्षण दिले आहे.







