नगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली गोवा राज्यातील दारूच्या 1 हजार 200 बॉक्ससह आयशर टेम्पो असा तब्बल 94 लाख 88 हजारांचा मुद्देमाल श्रीरामपूर येथील दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. नगर-मनमाड महामार्गावरील राहाता तालुक्यातील अस्तगाव फाटा परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक केली आहे.
गहू देवीसिंग मिल (वय 35, रा. इंदूर, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. नगर-मनमाड महामार्गावरून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती नगर येथील दारूबंदी विभागाला मिळाली होती. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर येथील पथकाने गेल्या चार दिवसांपासून बाभळेश्वर, अस्तगाव परिसरात सापळा लावला होता. मंगळवारी (दि. 27) नगर-मनमाड रोडवरील अस्तगाव फाटा येथे संशयित आयशर ट्रकची तपासणी केली असता, त्यात गोवा राज्यनिर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या दारूचे तब्बल 1200 बॉक्स आढळून आले. यात 74 लाख 88 हजार रुपये किमतीच्या रॉयल ब्लू व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 57 हजार 600 बाटल्या तसेच 20 लाख रुपये किमतीचा आयशर कंपनीचा ट्रक असा 94 लाख 88 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतिलाल उमाप, संचालक, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक उषा वर्मा, पुणे विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या आदेशानुसार अधीक्षक गणेश पाटील, प्रभारी उपअधीक्षक संजय सराफ, निरीक्षक अनिल पाटील, बी. टी. घोरतळे, ए. बी. बनकर, दुय्यम निरीक्षक एन. सी. परते, पी. बी. अहिरराव, डी. वाय. गोलेकर, के. यू. छत्रे, एम. डी. कोंडे, ए. सी. खाडे, व्ही. जी. सूर्यवंशी, व्ही. बी. जगताप, भाऊसाहेब भोर, संजय साठे, मुकेश मुजमुले, एस. आर. वाघ, विकास कंटाळे, प्रवीण साळवे, नेहाल उके, के. के. शेख, निहाल शेख, दीपक बर्ड यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.






