आगरताळा (त्रिपुरा) – लग्न समारंभात कोरोना नियमांचे पालन न केल्याने वधू वरासह वऱ्हाडी मंडळींशी असभ्य वर्तन करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी निलंबित केले आहे. त्रिपुरा येथील आगरताळ्यात ही घटना घडली आहे. मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्याकडे पाच आमदारांनी ही मागणी केल्यानंतर कारवाई केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सर्वच राज्यांमध्ये लग्न समारंभांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. उपस्थितांच्या संख्येसह मास्कचा वापर करण्याबाबत नियमावली केली आहे. त्याचे पालन केल्यास कारवाई केली जात आहे. आगरताळा येथे अशाच एका लग्नसमारंभावर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांसह छापा टाकला. या व्हिडिओत ते असभ्य वर्तन करत असल्याचे दिसून आले. वराची मानगुटी पकडून त्याला बाहेर काढत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. त्यावेळी कारवाईत ढिसाळपणा केल्याबद्दल आगरताळ्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाही त्यांनी निलंबित करण्याचा इशारा दिला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर भाजपच्या पाच आमदारांनी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करत निलंबित केले. या प्रकरणाचा अहवाल सादर करावा असे आदेश मुख्य सचिवांना देण्यास सांगितला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी दोन दिवसांपूर्वी एका लग्न समारंभात छाप टाकला होता. आकर्षक सजावट आणि रोषणाई केलेल्या या समारंभात पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा होता. या कारवाईवेळी एक महिला समारंभाच्या परवानगीचे पत्र यादव यांना देत आहे. ते पत्र फाडून संबधित महिलेच्या तोंडावर फेकले. त्यानंतर पाहुणे आणि नातेवाईकांना असभ्य भाषेत बोलत त्यांनी हाकलून लावले. तसेच नवरदेवाला मानगुटी पकडून धक्का मारून बाहेर जाण्यास सांगितले. या कारवाईवेळी अडथळा आणल्याने काहींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर त्रिपुरातील भाजपच्या पाच आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे बिप्लब कुमार देब यांच्याकडे यादव यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांन निलंबित केले आहे. कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकारी यादव यांनी माफी मागितली आहे. कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने ही कारवाई करण्यात आली. यात कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता असेही ते म्हणाले.






