कोलकाता (वृत्तसंस्था) । मंगळवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास कोलकात्यातील एका हॉटेलला आग लागल्याने एका लहान मुलासह नऊ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. ‘फ्री स्कूल स्ट्रीट’वरील ‘हॉटेल तैबा’मध्ये आग लागली, तेव्हा बहुतेक पाहुणे झोपलेले होते. हॉटेलमध्ये धूर पसरल्याने गुदमरून या लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी शहरात आलेल्या बांगलादेशी नागरिकांचाही समावेश होता.
या हॉटेलजवळच अग्निशमन दलाचे मुख्यालय आहे. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले. शिड्यांचा वापर करून अग्निशमन दलाच्या जवानांनी हॉटेलच्या खिडक्या फोडल्या आणि आत अडकलेल्या २८ जणांची सुटका केली. त्यांना कोलकात्यातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
कोलकात्याच्या ‘फ्री स्कूल स्ट्रीट’वर अनेक हॉटेल्स आहेत, जिथे बांगलादेशातून आलेले लोक वैद्यकीय उपचार आणि इतर कारणांसाठी मुक्काम करतात. बांगलादेशी नागरिकांशिवाय मृतांमध्ये मेघालय आणि अलीपूरद्वार (पश्चिम बंगाल) येथील रहिवाशांचाही समावेश होता. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.







