सर्व नियम धुडकावून भाजप आमदाराच्या मुलाचं लग्न थाटात

अररिया (बिहार) – देशात कोरोनाची परिस्थिती अतिशय बिकट असून लोकांनी विषाणू संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी कोरोनासाठीचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. मोठ्या संख्येने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत असून लोकांनी खबरदारी घ्यावी, यासाठी प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येते, मात्र अनेक जण या सूचनांकडे साफ दुर्लक्ष करतात. असाच एक प्रकार बिहारच्या अररिया जिल्ह्यातून समोर आला आहे.

सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी कोरोना नियमांना तिलांजली दिल्याचे दिसून आले. फरबिसगंज मतदारसंघाचे भाजपचे आमदार विद्यासागर केसरी यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना नियमांचे पालन केल्याचे कुठेही दिसून आले नाही. लग्नातील व्हिडीओत दिसत असल्यानुसार कोणीही कोरोनाचे नियम पाळत नसल्याचे दिसत होते. सध्या कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करणे गरजेचे असताना गर्दी जमवून मेजवानीही आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या लग्नाला जिल्ह्यातील बडे नेते, व्हीआयपी मंडळीही उपस्थित होती.

कोव्हिड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे प्रशासनाकडून आवाहन केले जात असताना, सत्ताधारी नेत्यांनीच असे बेजबाबदार वर्तन केल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आमदारांच्या मुलाच्या विवाहात कोव्हिड मार्गदर्शक नियमांचे उघडपणे उल्लंघन केले जात असताना तेथील पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याने टीका करण्यात येत आहे. कोरोनाचे नियम हे केवळ सर्वसामान्यांसाठीच बनवले आहेत का? अशी विचारणा केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here