पाटणा (बिहार) (वृत्तसंस्था) : येथे धावत्या बसमध्ये नेपाळी महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली. बिहारच्या पाटणा जंक्शनजवळ ही घटना घडली. या प्रकरणी पीडित महिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी बसचा चालक असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला नेपाळची रहिवासी आहे. कुटुंबाकडून वारंवार होत असलेला छळ सहन न झाल्यामुळे ती घर सोडून भारतात आली आहे. ती सिलिगुडीवरून पाटणा जंक्शनवर आली. तिथे या महिलेची ओळख एका तरुणासोबत झाली. हा तरुण या महिलेला एका खासगी बसमध्ये घेऊन गेला. तो तिला अनेक ठिकाणी घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिला धमकावले आणि तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपीने महिलेला बसमधून खाली उतरवलं आणि तिथून पळ काढला.
घाबरलेल्या महिलेने पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी खासगी बस चालक आहे. त्याचे नाव पोलिसांना कळाले असून ते लवकरच त्याला अटक करणार असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. पाटणा पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.पोलिसांनी महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले आहे.







