चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीवर ॲसिड हल्ला

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीवर अ‍ॅसीड हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घटली आहे. ही घटना बोपदेव घाटात घडली असून अ‍ॅसीड हल्ला करणाऱ्या पतीवर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश शिरपत धुमक (३९, रा. बावधन गाव, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव असून पत्नीनेच याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिनेश शिरपत धुमक आणि फिर्यादी हे पती पत्नी असून शनिवारी सकाळी दुचाकीवरून बोपदेव घाटात दिनेशने पत्नीला नेले होते. त्यावेळी त्याने मध्येच गाडी थांबवली आणि तिच्यावर संशय घेऊन कामाचे ठिकाण दाखविण्याची जबरदस्ती पत्नीवर केली. यावेळी तिने तिच्या कामाचे ठिकाण दाखविण्यास नकार दिला. यावर दिनेशने तिला, ‘तु कशी काम करते तेच बघतो’? अशी धमकी दिली. तसेच मला तुझा चेहरा पाहायचा आहे, असे म्हणत तिच्या चेहर्‍यावरील मास्क खाली करण्यास सांगितले.

त्यावेळी दिनेशने बाटलीतून आणलेले अ‍ॅसीड पत्नीच्या तोंडावर आणि अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. त्याने केलेल्या अ‍ॅसीड हाल्यात त्याच्या पत्नीच्या डाव्या डोळ्याच्या वरती व डाव्या दंडावर भाजुन जखम झाली. याप्रकरणी फिर्यादी पत्नीने पोलीसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस उपनिरीक्षक छाया गपाट करत आहेत. दरम्यान आरोपी दिनेशला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी आणि आरोपी हे मुळचे कोकणातील असून आरोपी हा फिल्टर दुरूस्तीचे काम करतो. तर फिर्यादी ही घरगुती काम करते. आरोपीचे पहिले लग्न झाले असून त्याने फिर्यादीच्या पतीच्या निधनानंतर तिच्यासोबत विवाह केला होता. परंतु, आरोपीला तिच्या चारित्र्यावर संशय असल्याने अ‍ॅसीडने हल्ला करत तिला गंभीर जखमी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here