भोर तालुक्यातील नरसापूर परिसरात वीज कोसळून दोन मुली ठार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चेलाडी येथे कातकरी वस्तीच्या टेकडीजवळ खेळत असलेल्या तीन मुलींवर रविवारी दुपारी अचानक वीज कोसळली. या दुर्देवी घटनेत दोन मुली जागीच ठार झाल्या, तर एकजण जखमी झाली आहे. चेलाडी फाट्यावर एसटी स्टॅण्डनजीक ही दुर्देवी घटना घडली.

या वेळी सीमा अरुण हिलम (वय ११) हिच्या अंगावर वीज पडली, तर तीच्या शेजारीच उभ्या असलेल्‍या अनिता सिंकदर मोरे (वय ९) हिला विजेचा झटका बसल्याने या दोघी जागीच ठार झाल्या. चांदणी प्रकाश जाधव (वय ९) ही जखमी झाली असून, दैव बलवत्तर म्हणून बचावली आहे. तिला तत्काळ रुग्णालयात नेऊन उपचार करण्यात आले.

राजगड ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक निरीक्षक मनोजकुमार नवसरे, उपनिरीक्षक राहूल साबळे, हवालदार प्रदीप भोसले, रजाक मन्यारी यांनी घटनेची पाहणी केली. मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपट्टी व जालिंदर बरकडे यांनी तत्काळ रोख स्वरूपात आर्थिक मदत पोहचवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here