सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – चिमणगाव (ता. कोरेगाव) येथे रास्त भाव धान्य दुकानातच (रेशन) दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) रेड टाकली. खळबळ उडवून देणार्या या कारवाईत देशी, विदेशीच्या साठा केलेल्या 71 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून स्कॉर्पिओ कारदेखील पोलिसांनी जप्त केली आहे.अमोल एकनाथ जाधव (वय 55, रा. चिमणगाव, ता. कोरेगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चिमणगावातील एका रेशन दुकानात दारूचा साठा असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी रेशन दुकानावर छापा पडल्याचे समजताच परिसरात बघ्यांची गर्दी झाली. पोलिसांनी कारवाई करत रेशन दुकानाची पाहणी केली असता तेथे दारूच्या बाटल्या होत्या. यानंतर बाहेर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ गाडीची पाहणी केली असता त्यामध्येही दारूच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता देशी दारूच्या 71, तर विदेशी दारूच्या 21 बाटल्या होत्या. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून संशयित आरोपीला अटक केली.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पो. नि. किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, सपोनि आनंदसिंग साबळे, पोलिस हवालदार ज्योतीराम बर्गे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, साबीर मुल्ला, अजित कर्णे, प्रवीण पवार, केतन शिंदे, निलेश काटकर, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, संकेत निकम यांनी कारवाईत सहभाग घेतला.






