नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – तपासणीसाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीशी डॉक्टरने अश्लील चाळे केले. ही खळबळजनक घटना २९ एप्रिल रोजी सावनेर येथे उघडकीस आली. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सावनेर पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
डॉ. अमोल बडगे (रा. रेल्वेस्टेशन रोड, सावनेर), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.२९ एप्रिलला बडगे याच्या हॉस्पिटलमध्ये पीडित तरुणी सोनोग्राफी करण्यासाठी आपल्या आईसोबत गेली. सोनोग्राफी करण्याच्या बहाण्याने बडगे याने तरुणीशी अश्लील चाळे केले.
तरुणी घरी परतली. त्यानंतर बडगे याने तिच्या मोबाइलवर संपर्क साधला व मॅसेज पाठविले. तरुणीने नातेवाइकांना हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाइकांसह पोलिस स्टेशन गाठून तरुणीने तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून बडगे याचा शोध सुरू केला.






