पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – येरवडा परिसरात असलेल्या टेक महिंद्रा कंपनीतील एका टीम लीडरनेच सहकारी तरूणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला आहे. तरूणीला स्पर्श करणे, वॉशरूमपर्यंत तिचा पाठलाग करणे, घाणेरड्या कमेंट करीत विनयभंग केला. या प्रकरणी संबंधित कंपनीच्या मॅनेजमेंटनेही टीमलीडरवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
संजय दास (रा. विमाननगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टीमलीडरचे नाव आहे. त्याशिवाय शिवी कालिया, माक डिसील्वा, हिमांशु शर्मा, इम्रान खान, निताश कुटी, हर्षवेंद्र सॉईन या मॅनेजमेंटविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 22 वर्षीय तरूणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी येरवड्यातील टेक महिंद्रा कंपनीमध्ये कामाला आहे. त्याठिकाणी संजय दास हा तरूणीचा टीमलीडर आहे. मार्च 2020 पासून संजय तरूणीसोबत लगट करण्याचा प्रयत्न करीत स्पर्श करणे, वॉशरूमला जाताना तिचा पाठलाग करीत होता. त्याशिवाय तरूणीने घातलेल्या कपड्यांबाबतही संजय घाणेरड्या कमेंट करीत होता.
टीम लीडर असल्यामुळे तरूणीने काही दिवस अन्याय सहन केला. त्यानंतर तिने मॅनेजमेंटकडे त्याची तक्रार केली होती. मात्र, संबंधित कंपनीच्या मॅनेजमेंटनेही कोणतीही कारवाई केली नाही. या तरुणीच्या तक्रारीनंतर येरवडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.






