राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजितसिंह यांचे कोरोनाने निधन

लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) – राष्ट्रीय लोकदलाचे (आरएलडी) अध्यक्ष, माजी केंद्रिय मंत्री चौधरी अजितसिंह यांचे कोरोनाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. 12 फेब्रुवारी 1939 रोजी जन्मलेले चौधरी अजितसिंह हे उच्चशिक्षित होते. 15 वर्षे अमेरिकेत त्यांनी मोठय़ा पदावर काम केले. 1980 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 1986ला राज्यसभेचे सदस्य झाले. त्यानंतर ते सहा वेळा खासदार होते. ते एनडीए आणि यूपीए या दोन्ही सरकारांमध्ये केंद्रात मंत्री होते. अजितसिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाचा पश्चिम उत्तरप्रदेशमध्ये दबदबा आहे.

त्यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. अजित सिंह चौधरी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख जाट नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या निधनाबद्दल रालोद आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.

उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या त्रिस्तरीय पंचायत निवडणुकांमध्ये रालोद आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीला लक्षणीय यश मिळाले होते. बागपत, मेरठ, शामली, अलीगढ आणि मथुरेत रालोद पक्षानेच चांगली कामगिरी केली होती. जाट समुदायाचा प्रभाव असलेल्या बागपतमध्ये रालोदने 20 पैकी 7 वॉर्डांमध्ये विजय मिळवला होता. या विजयानंतर रालोद कार्यकर्ते जल्लोष करणार होते. मात्र, अजित सिंह चौधरी यांची तब्येत बिघल्याने कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here