बरेली (उत्तरप्रदेश) – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असली, तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. परंतु, कोरोना मृत्यूचे वाढणारे प्रमाण चिंताजनक आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा तुडवडा अद्यापही जाणवत आहे. मात्र, उत्तर प्रदेशात एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. बरेली येथील आरोग्य विभागात तारीख उलटून गेलेल्या म्हणजेच ‘आऊट ऑफ डेट’ अँटिजन किटने तब्बल १० हजार कोरोना चाचण्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील बरेली येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. तारीख उलटून गेलेल्या अँटिजन किटने केलेल्या १० हजार कोरोना चाचण्यांपैकी बहुतांश अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगितले जात आहे. यातील अनेकांचा शोध घेऊन त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आहे. मात्र, ऑऊट ऑफ डेट झालेल्या किटने चाचण्या केलेल्या सर्व नागरिकांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी आरोग्य विभागातील अधिकारी काहीच बोलायला तयार नाहीत, असे सांगितले जात आहे.
उत्तर प्रदेशतील काही ठिकाणी सदोष किटचा पुरवठा केल्याचे लक्षात आल्यावर याबाबत मुख्यमंत्री कार्यालायाशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाने आरटी-पीसीआर चाचण्यावर भर देण्याची सूचना केली. मात्र, सदोष अँटिजन किटचा वापर करायचा की नाही, यासंदर्भात कोणतेच निर्देश दिले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. सदोष किटने चाचण्या केलेल्या हजारो जणांना निगेटिव्ह असल्याचा अहवाल देऊन सोडण्यात आले. मात्र, त्यातील बहुतांश जणांना कोरोनाची लागण झालेली असू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.






