गाडीवर भाजपचा बोर्ड लावून दारुची तस्करी

liquor-smuggling-in-bjp-car

वैशाली (बिहार) – येथील वैशाली जिल्ह्यात पोलिसांनी शनिवारी लॉकडाऊनदरम्यान एका कारवर कारवाई केली आहे. पोलिसांनी दारुची तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची कारदेखील जप्त केली आहे. जिल्ह्यातील गंगा पूल ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. महात्मा गांधी सेतूजवळ वाहनांची तपासणी सुरू असल्यानं कार अडवण्यात आली. त्यावर लावण्यात आलेला भारतीय जनता पक्षाचा बोर्ड पोलिसांना संशयास्पद वाटला. त्यामुळे पोलिसांनी कारची झडती घेतली.

पोलिसांनी तपासणीसाठी रोखलेल्या कारवर भाजप माजी जिल्हा अध्यक्ष, बाढ असा बोर्ड होता. हा बोर्ड पाहून पोलिसांना संशय आला. या कारवर कोरोना आपत्कालीन सेवा असं स्टिकरदेखील होतं. पोलिसांनी कारची झडती घेतल्यावर त्यात १५ कार्टन विदेशी मद्य आढळून आलं. पोलिसांनी कारमधील दोघांना अटक केली. त्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

भाजप माजी जिल्हा अध्यक्ष असा बोर्ड लावण्यात आलेली कार संशयास्पद वाटल्यानं तिची झडती घेण्यात आल्याची माहिती हाजीपूरचे एसडीपीओ राघव दयाळ यांनी दिली. ‘बिहारमध्ये बाढ नावाचा जिल्हाच नाही. बाढ नावाचं शहर आहे. बाढ हा पाटणा जिल्ह्याचा उपविभाग आहे. तो जिल्हा नाही. त्यामुळे तस्करींना लावलेला बोर्ड चुकीचा होता. यावरून संशय आल्यानं कारची झडती घेतली. त्यात १५ कार्टन मद्य सापडलं. कारमध्ये असलेल्या दोघांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे,’ असं राघव दयाळ यांनी सांगितलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here