रस्त्यावरील कुत्र्याला लाथ मारण्याच्या रिक्षाचालकाच्या प्रयत्नात रिक्षाचा अपघात

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – भरधाव रिक्षाच्या चालकाने रस्त्यात थांबलेल्या कुत्र्याला लाथ मारायचा प्रयत्न केला आणि त्याचा रिक्षावरील ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा दुभाजकावर चढली. यात चालक रिक्षातून रस्त्यावर पडला आणि रिक्षा चक्क दुभाजकावर धावली.

सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचा हा व्हिडीओ पिंपरी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी कॅम्पातील कराची चौक ते डिलक्स चौकादरम्यान हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार शगुन चौकातून डिलक्स चौकाकडे भरधाव जात असलेल्या रिक्षाचालकाने रस्त्यात थांबलेल्या कुत्र्याला लाथ मारण्याचा प्रयत्न केला. भांबावलेल्या कुत्र्याने भुंकायला सुरवात केली. त्यामुळे रिक्षातील चालक घाबरला आणि रिक्षावरील त्याचा ताबा सुटला. यात रिक्षा तेथील दुभाजकावर चढली. त्यामुळे चालक रिक्षातून रस्त्यावर पडला. त्यानंतरही रिक्षा दुभाजकावर धावून रस्त्याच्या दुस-या बाजूला गेली. त्यावेळी काही जणांनी सतर्कता दाखवत रिक्षाला थांबवले. त्यावेळी सुदैवाने विरुद्ध दिशेने वाहन येत नव्हते. त्यामुळे रिक्षाची इतर कोणत्याही वाहनाला धडकली नाही. तसेच वेळीच रिक्षाला थांबवल्याने तेथील दुकानांचेही नुकसान टळले.

अपघाताची ही घटना काही सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये कैद झाली. त्याचे फुटेज शनिवारी रात्री सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. रिक्षाचालकाने केलेल्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचे मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केले. मात्र याबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here