वडिलांना सांभाळण्याच्या वादातून गळा आवळून जन्मदात्या पित्याचाच केला खून

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – आई-वडिलांचा सांभाळ करण्यावरून मुलांमध्ये वाद होण्याच्या घटना नवीन नाहीत. या वादातून कधी आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठविले जाते तर कधी वैतागून आई-वडीलच घर सोडून जातात. संगमनेर तालुक्यातील चिखली येथे मात्र या वादातून मुलांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. वडिलांचा सांभाळ कोणी करायचा, यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला आणि यातून त्यांनी जन्मदात्याचाच खून केला.

संगमनेर तालुक्यात चिखली गावातील वीट भट्टीवर ही घटना घडली. तेथे दशरथ सुखदेव माळी (रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) यांचा खून झाला. गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला. या घटनेच्या तपासात ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी रामदास दशरथ माळी आणि अमोल दशरथ माळी या भावांना अटक केली आहे.

चिंचोली गुरव या गावातील माळी कुटुंब सध्या चिखली येथील एका वीट भट्टीवर कामाला आहे. वडील दशरथ यांचा सांभाळ कोणी करायचा यावरून रामदास आणि अमोल या दोघा भावांमध्ये वाद होता. यावरून अनेकदा भांडणही झाले. मंगळवारी रात्री याच विषयावरून त्यांच्यात वाद पेटला. हा वाद विकोपाला जाऊन मारामारी सुरू झाली. या वादात वडील मध्ये आले असावेत. त्यामुळे दोन्ही मुलांनी वडिलांच्या डोक्यात मारहाण केली. त्यांचा गळा दाबून खून केला. याची माहिती मिळाल्यानंतरसंगमनेर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

दोन्ही आरोपी मुलांना अटक करण्यात आली आहे. सांभाळ करण्याच्या वादातून झालेल्या भांडणात वडिलांचा खून झाल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली आहे.पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here