दहावीच्या परीक्षेबाबत आज अंतिम निर्णय?

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – सीबीएसई, एसएससी आणि आयसीएई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. दरवर्षी सुमारे 14 लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देत असतात. मात्र परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणं अशैक्षणिक असल्याची भूमिका घेत धनंजय कुलकर्णी यांनी ही याचिका दाखल केलीय.

यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज (19 मे) सुनावणी होणार आहे. त्यामुळे रद्द केलेली दहावीची परीक्षा पुन्हा होणार का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे. सोमवारी (17 मे) या याचिकेवर पहिली सुनावणी पार पडली. यावेळी केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतल्याचे सांगितलं. तसंच राज्य माध्यमिक मंडळ म्हणजेच एसएससी बोर्डाने निकाल जाहीर करण्याचे सूत्र अद्याप ठरवलं नसल्याची माहिती कोर्टाला दिली.

तिन्ही बोर्डांना परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यावर कोर्टात आज सुनावणी होईल. 12 मे रोजी राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द केल्याचा शासन निर्णय जारी केला. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

पहिल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने तिन्ही बोर्ड आणि महाराष्ट्र सरकारला आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आज कोर्टात राज्य सरकार परीक्षा रद्द करण्याबाबत भूमिका मांडणार. सीबीएसई बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इंटरनल असेसमेंटच्या माध्यमातून करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण एसएससी बोर्डाचे सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. तेव्हा राज्य सरकार कोर्टात दहावीचा निकाल कशाच्या आधारे जाहीर होईल याची माहिती देण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here