एरंडोल (शे जहांगीर शे नूरा) – मोदी सरकार ज्या राज्यात विरोधी पक्षात आहे, तेथील सरकार अस्थिर करून येनकेनप्रकारे ती सरकारे पाडण्याचा डाव सुरु केला आहे. हुकुमशाही मोदी सरकारने कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश यासारख्या राज्यांमधील लोकनियुक्त काँग्रेस सरकारे पैसे व बळाच्या जोरावर पाडली जात असून, त्याठिकाणी भाजपा विचारांचे किंबहुना भाजपाचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा प्रयत्न घटना व लोकशाही विरोधी आहे. या प्रवृत्तीचा एरंडोल तालुका काँग्रेसतर्फे निवेदनाद्वारे जाहीर निषेध करण्यात आला.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, राजस्थानमध्ये लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न होत आहे. आमदारांची पळवापळवी सुरु आहे, याकरिता राजस्थान विधानसभा अधिवेशन तातडीने बोलवावे. फ्लोअर टेस्ट लवकर करावी. लोकशाही घटनात्मक संस्था आणि लोकनियुक्त सरकारांवरती भाजप करत असलेल्या हल्ल्यांविरोधी देशातील प्रत्येक नागरिकास आवाज उठवण्याची गरज असून, दिवसाढवळ्या सुरु असलेल्या या लोकशाहीच्या हत्येविरोधात आवाज उठवणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.







