पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकाला मारहाण करून लुट करणाऱ्या दोघा तोतया पोलिसांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास खडी मशीन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.
मुब्बसिर हिदयतुल्ला राठविलकर (36, रा. लेकस्वार सोसायटी, दत्तनगर) आणि तौसिफ अहमद मोमीण (31, रा. नेपोव्हिल केप, कोंढवा बुद्रुक), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अजगर मोहम्मद युसुफ (31, रा. भिवंडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजगर युसूफ शनिवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास कात्रज चौकाकडून खडीमशीन चौकाकडे गॅस शिगडी घेऊन जात होते. त्यावेळी कात्रज ब्रिजच्या पुढे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मुब्बसिर आणि तौसिफने यांना त्यांनी पत्ता विचारला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडे पैसे मागितले, मात्र अजगर यांनी आरोपींना पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्यामुळे आरोपींनी अजगर यांच्या मालकाला फोन लावून शिवीगाळ करीत पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी 5 हजारांची मागणी केली. तसेच अजगर यांच्याकडून जबरदस्तीने पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करीत आहेत.






