पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – उसने पैसे वेळेत परत न केल्याने झालेल्या वादातून तरूणाच्या डोक्यात फरशी घालून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास दत्तनगर रस्त्यावरील तिरंगा चौकात घडली.
याप्रकरणी टोळक्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश रवींद्र नगरकर (29, रा. जांभुळवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव असून वडील रवींद्र नगरकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश याने काही दिवसांपुर्वी एकाकडून उसने पैसे घेतले होते. मात्र, पैसे वेळेत परत न दिल्यामुळे संबंधिताने शनिवारी योगेशला तिरंगा चौकात बोलावून घेतले. त्यावेळी पैशांच्या देवाणघेवणीवरून त्यांच्यात वादावादी झाली. त्याचा राग आल्यामुळे आरोपीने योगेशच्या डोक्यात फरशी मारुन जखमी केले. त्यानंतर टोळक्याच्या मदतीने योगेशवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे तपास करीत आहेत.







