पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – लॉकडाऊनच्या ३ महिन्यात सेक्सटॉर्शनच्या तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पुण्यातील तब्बल १५० जणांच्या ऑनलाईन सेक्स चॅट करणे चांगलेच अंगलट आले आहे. हा आकडा पोलिसांकडे तक्रार केलेल्यांचा आहे. पण, ज्यांनी आपल्या आब्रुला घाबरून तक्रार केलेली नाही अशा लोकांचीही मोठी संख्या असण्याचे नाकारता येणार नाही.
कोरोना महामारीमुळे जगभरात अनेक भागात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी अनेक संस्थांनी ऑनलाईन पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली. त्यामुळे इंटरनेटचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या वाढीबरोबरच सायबर गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. पोलिसांकडे सायबर तक्रारी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या आहेत. या तक्रारींमध्ये सेक्सटॉर्शनच्या तक्रारींची संख्या लक्षणीय आहे.
नेटकरी सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात साधी एक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्याने ओढले जात आहेत. पुण्यातील एका २८ वर्षाचा मुलगा असलेल्या महिलेला त्याच्या मुलाचा अश्लिल व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आला. विशेष म्हणजे हा व्हिडिओ काही क्षणापूर्वीच रेकॉर्ड झाला होता. हा २८ वर्षाचा मुलगा एका पूजा नावाच्या मुलीसोबत व्हिडिओ चॅट करत होता. त्याचा हा अश्लिल व्हिडिओ त्याच्या जवळच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये शेअर केल्यानंतर त्याला लक्षात आले की आपण सेक्सटॉर्शनला बळी पडलो आहे.
हा व्हिडिओ २८ वर्षाच्या मुलाच्या आईला पाठवल्यानंतर, एका अनोळखी पुरुषाचा फोन त्या मुलाला आला. त्याच्याकडे हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी २५ हजार रुपयांचा मागणी करण्यात आली. जर पैसे दिले नाही तर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. ही फक्त एक घटना आहे. पुणे सायबर क्राईम गेल्या ३ महिन्यापासून सेक्सटॉर्शनच्या १५० केसेस हाताळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही पुणे सायबर क्राईमकडे ११० सेक्सटॉर्शनच्या तक्रारी आल्या आहेत. या फक्त एप्रिल महिन्यातील तक्रारी आहेत.
ही सेक्सटॉर्शनची टोळी फेसबुकवर, इन्स्टाग्राम आणि टेलेग्राम कार्यरत आहे. ते मुलींच्या नावाने अकाऊंट काढतात. त्यानंतर ते सोशल मीडियावर प्रतिष्ठित व्यक्तींना आपले टार्गेट करतात. त्या पहिल्यांदा अशा पुरुषांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. त्यानंतर त्या हळू हळू त्यांना व्हिडिओ कॉल करतात. त्यानंतर त्या ऑनलाईन सेक्ससाठी विचारणा करतात. ज्यावेळी हे पुरुष त्यांच्या जाळ्यात आडकतात आणि लैंगिक कृत्ये करण्यास सुरु करतात त्यावेळी ते व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करतात. तेथूनच सेक्सटॉर्शन सुरु होते. आपली बदनामी होऊ नये यासाठी या व्यक्ती खंडणी देतात.






