कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतरही अँडीबॉडीज् तयार न झाल्याचा आरोप; अदर पुनावाला यांच्याविरुद्ध तक्रार

लखनौ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसैन) – अदर पुनावाला यांच्याविरुद्ध लखनौमधील एका व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यांने सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला आणि इतरांविरुद्ध कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतरही अँडीबॉडीज् तयार झाले नसल्याचा आरोप केला आहे.

लखनौ येथील आशियाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. यात अदर पुनावाला यांच्या बरोबरच डीसीजीए संचालक, आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक अपर्णा उपाध्याय यांच्याही नावांचा समावेश आहे.

ही तक्रार प्रताप चंद्रा यांनी दाखल केली आहे. ते म्हणाले, ‘८ एप्रिलला कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतला. त्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी मिळणार होता. पण, त्या दिवशी मला सांगण्यात आले की दुसऱ्या डोससाठीचा कालावधी वाढवला आहे. आता दुसरा डोस ६ आठवड्यांनी मिळणार आहे. आता सरकारने दुसऱ्या डोसची कालमर्यादा १२ आठवडे केली आहे.’

चंद्रा पुढे म्हणाले की, ‘आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी सांगितल्याप्रमाणे कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर तुमच्या शरिरात चांगल्या प्रमाणात अँटी बॉडीज् तयार होतील. त्यानंतर मी सरकारमान्य लॅबमधून कोव्हिड अँटीबॉडी चाचणी करुन घेतली. या चाचणी अहवालात कोणत्याही प्रकराच्या अँटीबॉडीज् तयार झाल्याचे दिसून आलेले नाही. त्याच्या ऐवजी माझ्या प्लेटलेट ३ लाखांवरून १.५ लाखांवर आल्या.’

चंद्रा यांनी लस घेतल्यानंतर मला विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक वाढला असा आरोप केला. कारण त्यांच्या प्लेटलेट काऊंट निम्म्याने खाली आला होता. पोलिसांनी चंद्रा यांची तक्रार नोंदवून घेतली आहे. पण, अजूपर्यंत एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की विषयाचे गांभीर्य पाहता कोणतीही कारवाई करण्यापूर्वी वरिष्ठांना याची माहिती दिली गेली आहे. दरम्यान, तक्रारदाराने जर या बाबत एफआयआर दाखल झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही या तक्रारीतून दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here