नवी दिल्ली – अभिनेत्री जुही चावलाने आज ( दि. ३१ ) ५ जी वायरलेस नेटवर्क विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जुही चावलाने या नेटवर्कमुळे देशातील जनतेला, प्राण्यांना रेडिएशनचा दुष्परिणाम भोगावा लागणार आहे असा दावा केला आहे.
ही याचिका पूर्वी न्यायमूर्ती सी हरी शंकर यांच्या बेंचसमोर सुनावणीसाठी होती. आता ही दुसऱ्या बेंचकडे वर्ग केली आहे. या याचिकेवर आता २ जूनला सुनावणी होणार आहे. जुही चावला यावेळी म्हणाल्या की, ‘टेलिकम्युनिकेशन उद्योग ५ जी सेवा देण्याचा प्लॅन करत आहेत. पण, यामुळे पृथ्वीतलावरील प्रत्येक व्यक्ती, प्राणी, पक्षी, किटक आणि वनस्पती आरएफ रेडिएशनपासून वाचू शकणार नाही. हे रेडिएशन सतत २४ तास ३६५ दिवस भोगावे लागेल. या रेडिएशनची तीव्रता सध्या अस्तित्वात असलेल्या रेडिएशनच्या तुलनेत १० ते १०० टक्के जास्त आहे.
या ५ जी प्लॅन्समुळे मानवावर गंभीर आणि कधीही न भरुन येणारे परिणाम होण्याचा धोका आहे. यामुळे पृथ्वीवरील सगळ्या इकोसिस्टमचे कायमचे नुकसान होईल. असे जुही चावला यांचे मत आहे. ही याचिका ॲड. दीपक खोसला यांच्यामार्फत दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत सरकारला हे ५ जी तंत्रज्ञान पुरुष, महिला, तरुण, बालक, नवजात बालके, प्राणी, प्रत्येक सजीव गोष्ट, स्थानिक वनस्पती आणि सजीव यांच्यावर परिणाम करणार नाही असे प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.






