पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने एका कंत्राटदाराला दिलेला चेक बँकेत वटविल्यानंतर संबंधित चेक क्रमांकाचा गैरवापर करून मूळ 71 हजार 464 रुपयांचा असलेला चेक तब्बल 2 कोटी 92 लाख रुपयांचा क्लोन केल्याचा प्रकार सुमारे वीस दिवसांपूर्वी समोर आला. संबंधित चेक बँकेत डिपॉझिट करण्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे समितीच्या काही अधिकाऱ्यांच्या हाती आल्यामुळे हा प्रकार समोर आला.
याप्रकरणी बाजार समितीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुणे बाजार समितीने फळे-भाजीपाला विभागामधील सांडपाणी वाहून नेण्याच्या पाइपलाइनचे चेंबर व दोन गाळ्यांच्या पाकळ्यांच्या जागेतील खड्डे बुजवून पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचे कंत्राट कर्वेनगर येथील मे. वास्तू कन्स्ट्रक्शनतर्फे सुहास येवले यांना दिले होते. मे. वास्तू कन्स्ट्रक्शन्स यांना पुणे बाजार समितीकडून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 2020 मध्ये 71 हजार 464 रुपयांचा चेक क्रमांक 601699 हा चेक देण्यात आला होता.
हा चेक बँकेत वटलादेखील होता. मात्र, याच चेक क्रमांकाने मे. ओम सिमेंट प्रॉडक्äट्स या नावाने रक्कम बदलून 2 कोटी 95 लाख रुपये चेकवर लिहून प्रशासक मधुकांत गरड आणि उपसचिव सतीश कोंडे यांच्या सहीसह क्लोन करण्यात आल्याचा प्रकार बाजार समितीच्या निदर्शनास आला. त्यानंतर बाजार समितीने स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. याबाबत प्रशासक मधुकांत गरड म्हणाले, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असून, पोलीस तपास सुरू आहे.
बाजार समितीने संबंधित कंत्राटदाराला 71 हजार रुपयांचा चेक दिल्यानंतर तो बँकेत वटविण्यात आला. चेक वटविल्यानंतर हा चेक कोणी क्लोन केला, याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे, मात्र क्लोन केलेला चेक बँकेत डिपॉझिट न करता सोशल मीडियावर आल्यामुळे चेक क्लोन गैरवापर की रक्कम काढण्यासाठी केला गेला, हे पाहणे जरूरीचे आहे.






