बेगूसराय (बिहार) – एका माथेफिरु पतीने घटस्फोटित पत्नीच्या कुटुंबाला खोलीत बंद करुन आग लावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या आगीत सासू आणि मुलीचा होरपळून मृत्यू झाला असून चारजण गंभीर अवस्थेत आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
बिहारच्या बेगूसराय इथली ही घटना आहे. मोहम्मद मुख्तार असे आरोपीचे नाव आहे. मोहम्मद मुख्तार याचा हलीमा खातून या तरुणीशी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघांना चार मुली झाल्या. पण हळहळू त्यांच्या सुखाच्या संसाराला जणू कोणाची दृष्ट लागली. त्यांच्यामध्ये खटके उडायला लागले आणि ते इतके वाढले की मुख्तारने हलीमाला घटस्फोट दिला.
घटस्फोट देऊन चार वर्ष झाली. तेव्हापासून हलीमा आपल्या मुलींसहीत माहेरी राहत होती. मात्र घटस्फोटानंतरही मुख्तार हलीमाला सुखाने जगू देत नव्हता. त्याने तिच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी दिली होती. मात्र सततच्या धमक्या देत असल्याने हलीमाने दुर्लक्ष केले. रविवारी दुपारी 3 च्या सुमारास मुख्तार हलीमाच्या घरी पोहोचला. दुपारची वेळ असल्याने घरात सगळे झोपले होते. अशावेळी मुख्तारने दरवाजाला बाहेरुन कडी लावली. त्यानंतर दरवाजाच्या बाहेर भरपूर विटा लावल्या आणि नंतर रॉकेल ओतून आग लावली.
शेजाऱ्यांना काही कळायच्या आत आगीचा भडका उडाला आणि पेट घेतला. संपूर्ण कुटुंब आतून मदतीसाठी किंचाळत होते. शेजाऱ्यांच्या लक्षात य़ेताच त्यांनी धाव घेत दार तोडले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या आगीत आरोपीची सासू आणि मुलगी अस्मा यांचा मृत्यू झाला. तर हलीमासह इतर तीन जण गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून मोहम्मद मुख्तार याची सायकल आणि चप्पल जप्त करण्यात आली असून तो फरार असल्याची माहिती पोलीसांनी दिली असून ते याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






