नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – कोरोनाचा विळखा सैल होत असताना नागपुरकरांच्या मनात आता म्युकर मायकोसिसची धास्ती बसली आहे. एकीकडे विषाणूच्या संक्रमणातून सुटका होत आहे. तर दुसरीकडे म्युकरने अक्षरश: धुमाकूळ सुरू केला आहे. विभागात सोमवारी नव्याने ३१ नव्या म्युकग्रस्तांची भर पडली. त्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. असतानाच ब्लॅक फंगसचे संक्रमण झालेल्या १२ रुग्णांची सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. ब्लॅक फंगसमुळे नागपुरातील मृत्यूची संख्या आता शतकाच्या उंबरठ्यावर ९७ पर्यंत धडकली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने घेतलेल्या नोंदिनुसार नव्याने वाढलेल्या ३१ रुग्णांमुळे आतापर्यंत विभागात बुरशीने संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या तेराशेच्या उंबरठ्यावर १२९४ पर्यंत पोचली आहे. या घडामोडीत सोमवारी दगावलेल्या १२ जणांमुळे विभागात आतापर्यंत या आजाराने १०२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. ब्लॅक फंगसमुळे विभागात मरण पावलेल्यांपैकी ९७ मृत्यू हे एकट्या नागपुरातील आहेत.
कोव्हिड पश्चात नव्याने ब्लॅक फंगसचे निदान करण्यात आलेल्यांमध्ये पुन्हा एकदा नागपूर जिल्ह्यातील रुग्ण संख्या मोठी आहे. जिल्ह्यात सोमवारी अशा २६ नव्या रुग्णांना म्युकर मायकोसिस या काळ्या बुरशीने गाठल्याचे निदान झाले. वर्धा जिल्ह्यात ३ आणि भंडारा जिल्ह्यातील २ नव्या रुग्णांचीही भर पडली.






