नागपुरात लाचखोर वर्ग-१ चा अधिकारी ACB च्या जाळ्यात; ७० हजारांची लाच घेताना अधीक्षक अभियंत्याला रंगेहाथ पकडले

लाचलुचपत
file photo

नागपूर (उपसंपादक आकाश शेगये) | जलसंपदा विभागातील एका वर्ग-१ (Class 1) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. रविंद्र निलकंठराव वानखेडे (वय आणि पद: अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, जलसंपदा विभाग, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर लोकसेवकाचे नाव आहे. या धडक कारवाईमुळे नागपूर शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे नोंदणीकृत कंत्राटदार (Contractor) आहेत. त्यांनी करजखेडा (जि. भंडारा) येथील १० लाख रुपये आणि लखमापूर (जि. नागपूर) येथील १५ लाख रुपये अशा एकूण २५ लाख रुपयांच्या पाठबंधाऱ्यांच्या कामाचे प्रलंबित बिल मंजुरीसाठी नागपूर जलसंपदा विभागाकडे सादर केले होते.

हे बिल मंजूर करून देण्यासाठी अधीक्षक अभियंता रविंद्र वानखेडे यांनी २ टक्के प्रमाणे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात तातडीने नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) अधिकृत तक्रार नोंदवली.

ACB पथकाने गुरुवारी, दिनांक २१ मे २०२६ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी आरोपी वानखेडे याने जुन्या बिलाच्या तडजोडीचे ५० हजार रुपये आणि भुराटोला (जि. भंडारा) व खडकी मायनर (नागपूर) येथील १० लाख रुपयांच्या नवीन कामाची निविदा मंजूर करून देण्यासाठी आणखी २० हजार रुपये, अशा एकूण ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

लाचेची रक्कम ठरताच, ACB च्या पथकाने जलसंपदा विभागाच्या कार्यालयातच सापळा रचला. वानखेडे यांनी स्वतःच्या दालनात कंत्राटदाराकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

लाचखोर अधीक्षक अभियंता रविंद्र वानखेडे यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. यावेळी त्यांच्या खिशातून लाचेच्या रक्कमेव्यतिरिक्त ३६,६३०/- रुपयांची संशयास्पद रोकड आढळून आली असून ती देखील पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी नागपूर शहर येथील धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची धडाकेबाज कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here