“सत्तेसाठी नाही, सेवेसाठी…” युवराज दाखले यांच्याकडून ‘शिवशाही शासन’ पक्षाची अधिकृत घोषणा

शिवशाही शासन

पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) | “सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्यांच्या खऱ्या सेवेसाठी” हे ब्रीदवाक्य घेऊन लोकसेवक युवराज दाखले यांनी आज ‘शिवशाही शासन’ या नव्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘रयतेचे राज्य’ या संकल्पनेतून आणि आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समतेच्या विचारांतून प्रेरणा घेऊन या पक्षाची स्थापना करण्यात आल्याचे दाखले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

पक्षाची भूमिका स्पष्ट करताना लोकसेवक युवराज दाखले म्हणाले, “गेल्या ७० वर्षांत प्रस्थापित राजकीय पक्षांनी गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार, मातंग आणि बहुजन समाजासह तृतीयपंथी भगिनी व व्यापाऱ्यांचा केवळ मतांसाठी वापर करून फसवणूक केली आहे. आज शिक्षणाचा बाजार मांडला गेला आहे, बेरोजगारीने तरुण होरपळत आहेत आणि नागरी समस्यांनी महाराष्ट्र पोखरला आहे. आता या सर्व वंचितांना सत्तेत हक्काची भागीदारी मिळवून देण्यासाठी ‘शिवशाही शासन’ मैदानात उतरत आहे.”

पक्षाने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी खालील ५ सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे यात

१. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल

  • खाजगी क्लासेसची सुरू असलेली लूट पूर्णपणे बंद करणार.
  • सरकारी शाळांचे सक्षमीकरण करून गुणवत्ता वाढवणार.
  • SC, ST, OBC, NT आणि VJNT संवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देणार.

२. रोजगार आणि सामाजिक सुरक्षा

  • ‘प्रत्येक घरात एक नोकरी’ हे उद्दिष्ट साध्य करणार.
  • तृतीयपंथी, विधवा महिला आणि दिव्यांग बांधवांसाठी विशेष कल्याणकारी योजना राबवणार.

३. स्वच्छता व मोफत आरोग्य

  • “नालामुक्त व रोगमुक्त महाराष्ट्र” ही विशेष मोहीम हाती घेणार.
  • प्रत्येक प्रभागात आणि गावात सर्वसामान्यांसाठी मोफत दवाखान्याची सोय करणार.

४. शेतकरी, कामगार आणि व्यापारी हित

  • शेतमालाला कायद्यानुसार हमीभाव मिळवून देणार.
  • असंघटित व संघटित कामगारांना किमान २५ हजार रुपये महिना पगाराची हमी.
  • छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांवरील जाचक अटी व नियम रद्द करणार.

५. स्वाभिमान आणि सत्तेत वाटा

  • छत्रपती शिवाजी महाराज, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवणार.
  • समाजातील शेवटच्या घटकाला सन्मान आणि सत्तेत प्रत्यक्ष सहभाग मिळवून देणार.

“हा पक्ष कोणत्याही एका नेत्याचा किंवा घराण्याचा नसून, तो प्रामाणिक कार्यकर्ते आणि जनतेचा असेल. ‘शिवशाही शासन’ म्हणजेच खऱ्या अर्थाने ‘सेवेचे शासन’ असेल,” असा विश्वास युवराज दाखले यांनी व्यक्त केला. तसेच पक्षाचे अधिकृत चिन्ह आणि निशाणी लवकरच निवडणूक आयोगाच्या मान्यतेने जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here