पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) | ताथवडे-रावेत रस्ता परिसरात असलेल्या प्रसिद्ध ‘ए.जे. फर्निचर’ मॉलच्या मालकावर २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बेछूट गोळीबार करणाऱ्या बिष्णोई टोळीच्या ३ कुख्यात गुंडांना अटक करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाला (Crime Branch) यश आले आहे. पोलिसांनी या आरोपींना थेट उत्तराखंडमधील हरिद्वार येथून ताब्यात घेतले असून, न्यायालयाने त्यांना २८ मे २०२६ पर्यंत (८ दिवस) पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे २०२६ रोजी व्यावसायिक जगदीश भेराराम बिष्णोई यांचे भागीदार अशोक कुमार बिष्णोई यांना एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून (+1 912 310 3107) व्हॉट्सॲप कॉल आला होता. फोन करणाऱ्याने त्यांच्याकडे २ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करत, पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.
बिष्णोई यांनी या धमकीला प्रतिसाद न दिल्याने, १५ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जेव्हा जगदीश बिष्णोई पुनावळे येथील मॉलबाहेर बसले होते, तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्खोरांनी त्यांच्या दिशेने ५ ते ६ राऊंड फायर केले. या जीवघेण्या हल्ल्यातून बिष्णोई थोडक्यात बचावले. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासासाठी ७ विशेष पथके तयार केली होती, ज्यातील २ पथके तात्काळ परराज्यात रवाना झाली. यात पोलिसांनी ताथवडे ते रावेत परिसरातील तब्बल ३५० ते ४०० सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले. संशयित आरोपी वास्तव्यास असलेल्या लॉजेसची तपासणी केली असता, त्यांचे नाव व मूळ पत्ता पोलिसांच्या हाती लागला. आरोपी हरियाणातील रोहतकचे असल्याने पोलिसांचे एक पथक तिथे पोहोचले, मात्र आरोपी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे पळून गेल्याचे समजताच पोलिसांनी तिथे जाऊन तिघांना बेड्या ठोकल्या.
या प्रकरणी पोलिसांनी परवीन रामनिवास (वय २२ वर्षे, रा. बेरी, झज्जर, हरियाणा), पंकज कुलदीप (वय २१ वर्षे, रा. कलानौर, जिल्हा रोहतक, हरियाणा), सागर अजयपाल (वय २१ वर्षे, रा. सोनीपत, हरियाणा) या आरोपींना ताब्यात घेतले आहेत.
प्राथमिक तपासामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या या शूटर कडून मिळालेल्या कबुलीजबाबावरून, हा संपूर्ण गुन्हा बिष्णोई गँगचे सक्रिय सदस्य आरजू बिष्णोई, शुभम लोणकर आणि कुलदीप ऊर्फ कशीष यांच्या सांगण्यावरून व कट रचून करण्यात आला होता. यातील कुलदीप ऊर्फ कशीष हा प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. आरजू बिष्णोई यानेच या हस्तकांना दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे, पैसे आणि वाहने पुरवली होती.
पोलिसांनी सांगितले की, बिष्णोई टोळीविरुद्ध खून, खंडणी आणि अवैध शस्त्र बाळगण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी पिंपरी-चिंचवडमधील दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘वीर फर्निचर’च्या मालकाला तसेच संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे खंडणीसाठी फोन आले होते. या दोन्ही गुन्ह्यांतही याच अटक केलेल्या आरोपींचा सहभाग आहे का, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.
सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ २) श्री. गणेश इंगळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष माने, पोलीस निरीक्षक संदीप सावंत (युनिट २), पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे (रावेत पो.स्टे.), पोउपनि समीर लोंढे, मयुरेश साळुंखे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही मोहीम फत्ते केली.







