धुळे जिल्ह्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; साडेआठ लाखांच्या मुद्देमालासह पिकअप वाहन जप्त

देशी दारूचा कारखाना

शिरपूर (प्रतिनिधी पवन मराठे) | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिरपूर पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे न्यू बोराडी गावातील जामन्यापाडा शिवारात एका झोपडीवर धडक छापा टाकला. या कारवाईत बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला असून, घटनास्थळावरून ८ लाख ४७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांची चाहूल लागताच मुख्य आरोपी राजेश पावरा व त्याचा साथीदार घटनास्थळावरून फरार झाले असून, प्रशासन त्यांचा कसून शोध घेत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मा. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, नाशिक विभागाच्या उप आयुक्त श्रीमती यु. आर. वर्मा आणि धुळे जिल्ह्याच्या अधीक्षक श्रीमती स्वाती काकडे यांनी बनावट मद्य निर्मिती व विक्री रोखण्यासाठी कडक आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार कारवाई करत असताना, शिरपूरचे निरीक्षक देविदास नेहूल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जामन्यापाडा शिवार येथील मच्छिंद्र तारासिंग पावरा याच्या नाल्याकाठच्या झोपडीवजा घरात बनावट देशी दारू तयार केली जात आहे. दोन पंचांच्या उपस्थितीत संपूर्ण स्टाफसह या ठिकाणी अचानक छापा टाकला असता, तिथे मोठ्या प्रमाणावर बनावट दारू बनवण्याचे साहित्य आढळून आले.

कारखान्यावर मारलेल्या छाप्यात उत्पादन शुल्क विभागाने  ‘टॅगो पंच’ देशी दारूच्या ९० मिलीच्या ३०० सीलबंद बाटल्या (३ बॉक्स), ५०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिक टाकीमध्ये साठवलेली ४५० लिटर तयार बनावट देशी दारू, २५० लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक ड्रममध्ये भरलेले ५०० लिटर शुद्ध मद्यार्क (स्पिरीट), ९० मिलीच्या १२,००० रिकाम्या बाटल्या, ५,००० जिवंत बुचे, ३०० रिकामे खोके आणि २० प्लास्टिक ट्रे, दारूच्या बाटल्यांचे बूच बसवणाऱ्या २ कॅप सीलिंग मशिन्स आणि ३५ लिटर क्षमतेचे २ प्लास्टिक केन, दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे १ बोलेरो पिकअप चारचाकी वाहन.  असा एकूण रु. ८,४७,४००/- मुद्देमाल जप्त केला आहे.

कारखाना चालवणारा मुख्य आरोपी राजेश पावरा आणि त्याचा साथीदार पथकाला पाहताच पसार झाले. याप्रकरणी फरार आरोपी व इतर संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या विविध कलमांनुसार (कलम ६५, ८१, ८३, ९०, १०८) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या बनावट कारखान्याला कच्चे साहित्य पुरवणारे मुख्य सूत्रधार आणि इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

सदरची धडाकेबाज कामगिरी शिरपूरचे निरीक्षक देविदास नेहूल, जवान काशिनाथ गोसावी, प्रतीकेश भामरे आणि वाहन चालक रविंद्र देसले यांच्या पथकाने केली. या मोहिमेत हाडाखेड सीमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक मुकेश पाटील, संतोष निकम, जवान एम. पी. म्हस्के, हेमंत पाटील आणि वाहन चालक निलेश मोरे यांनी महत्त्वपूर्ण मदत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास धुळे जिल्हा अधीक्षक श्रीमती स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here