सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) । सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कुपवाड पोलिसांच्या मदतीने एका विना नंबरच्या इनोव्हा गाडीचा तब्बल ४५ मिनिटे थरारक पाठलाग करून तब्बल १३४ किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एका सराईत तस्कराला अटक करण्यात आली असून, गांजा, आलिशान कार आणि मोबाईल असा एकूण ४२ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तैनात केले होते.
दिनांक २० मे रोजी रात्रीच्या सुमारास पथकातील पोलीस अंमलदार संदीप नलावडे आणि सागर लवटे यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बारामती येथील एक इसम विना नंबरच्या सोनेरी रंगाच्या इनोव्हा कारमधून गांजा घेऊन तासगावमार्गे सांगलीकडे येत आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी कवलापूर येथे सापळा रचला. काही वेळातच संशयित इनोव्हा कार भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांनी तिला थांबवण्याचा इशारा केला असता, चालकाने गाडी न थांबवता वेगाने पळवून नेली. यानंतर एलसीबीच्या पथकाने खाजगी वाहने आणि मोटारसायकलवरून त्या कारचा पाठलाग सुरू केला.
संशयित आरोपीने माधवनगर, संजयनगर, अहिल्यानगर, रामरहीम कॉलनीच्या गल्लीबोळातून कार अत्यंत वेगाने पळवली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एलसीबीने संजयनगर आणि एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याला सतर्क केले. अखेर सर्वांनी मिळून जुना जकात नाका कुपवाड चौक येथे कारची नाकेबंदी केली. सुमारे ४५ मिनिटांच्या थरारक पाठलागानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता कारच्या पाठीमागील डिक्कीत ३३ लाख ५० हजार रुपये किमतीचा १३४ किलो ग्रॅम तयार गांजा (६६ खाकी रंगाचे पॅकेट्स आणि निळी पिशवी) सापडला. पोलिसांनी ९ लाख रुपयांची इनोव्हा कार, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ४२,६३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विकी विजय कांबळे (वय ३२, रा. जाळोची, ता. बारामती, जि. पुणे) असे आहे. चौकशीत समोर आले की, हा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून पुणे ग्रामीणच्या बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ४७८ किलो गांजाच्या गुन्ह्यात तो बऱ्याच दिवसांपासून पोलिसांना पाहिजे असलेला मुख्य आरोपी आहे.
आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार, त्याचा पुणे येथील मित्र चंदनसिंग याने हा गांजा आणण्यासाठी पैसे दिले होते. हा माल ओडिसा राज्यातील संभलपूर येथील ‘जॉकी’ नावाच्या व्यक्तीकडून विकत घेतला होता आणि तो सांगली येथील ‘पप्पू फाकडे’ (रा. हरीपूर) याला देण्यासाठी बारामती-मायणी-विटा-तासगाव मार्गे आणला जात होता.
या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS एक्ट) १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे करत आहेत.







