पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसाची कोविड सेंटरच्या डॉक्टरांना मारहाण

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – फोन उचलला नाही, म्हणून महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरांना मारहाण केली. त्याची तक्रार देण्यासाठी बाणेर पोलीस चौकीत आलेल्या दोघा डॉक्टर व सुरक्षा रक्षकाला शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेत काम करणार्‍या एका पोलीस कर्मचार्‍याने आपल्या भावाच्या मदतीने पोलीस चौकीत मारहाण केली.

याप्रकरणी पोलीस नाईक सचिन सिद्धेश्वर गायकवाड (वय ४०) आणि सागर सिद्धेश्वर गायकवाड (वय ३५, दोघे रा. डी. पी. रोड, औंध) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सागर गायकवाडला अटक केली आहे. सचिन गायकवाड पळून गेला. याबाबत बाणेर येथील महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमधील डॉ. अजयश्री मस्कर यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. त्यांच्याकडे प्रविण जाधव यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. सागर गायकवाड याने फिर्यादी यांना फोन केला होता. पण त्यांनी कामात असल्याने तो घेतला नाही. सागर याने त्यांच्या व्हाट्सअपवर मेसेज पाठवून त्यांना शिवीगाळ केली होती. हा प्रकार फिर्यादी यांनी पोलिसांना कळविला होता. दरम्यान, सोमवारी दुपारी दीड वाजता सागर हा जाधव यांचा भाचा असल्याचे सांगून कोविड सेंटरमध्ये आला. तेथे त्याने फिर्यादी व तेथील एका कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. यावेळी दोन मार्शल तेथे आले. त्यांनी दोघांना समजावून पोलीस चौकीत जाऊन तक्रार देण्यास सांगितले.

त्यानुसार फिर्यादी व त्यांच्या सहकारी डॉक्टर व सुरक्षा कर्मचारी हे बाणेर येथील पोलीस चौकीत गेले. तेथे सागर गायकवाड याने पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड व इतर पोलीस मित्रांना बोलावून घेतले. त्या सर्वांना दोघा डॉक्टर व सुरक्षा कर्मचार्‍यांना मारहाण केली. चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक तेथे आल्यानंतर डॉक्टरांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here