श्री संत मुक्ताबाई तिरोभूत अंतर्धान समाधीसोहळा यंदा वैशाख कृष्ण दशमी दि.4 जुन 2021 शुक्रवार रोजी घरी राहून साजरा करण्याचे आवाहन श्री संत मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर समाधीस्थळ यांनी केले आहे.
सविस्तर असे की श्री संत मुक्ताबाई विजेच्या प्रचंड कडकडाटात वैशाख कृष्ण दशमी दिनी अंतर्धान झाल्या.परंपरेनुसार दरवर्षी वैशाख दशमीला संपूर्ण राज्यात व राज्याबाहेर मुक्ताबाई समाधी सोहळा साजरा करतात.यावर्षीचे पंचांगात दशमी तीथी 4जुन रोजी आहे. 5 जुन रोजी अहोरात्र एकादशी वृध्दी तिथी व 6 जुन रोजी सुध्दा एकादशी तिथी अशी दोन दिवस आलेली आहे.आपल्याला वारीची, उपवासाची एकादशी 6 जुन रविवार रोजी करावयाची आहे.
श्री संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी दिवसानिमित्त जाणून घेऊया संत मुक्ताबाईंविषयी
संत मुक्ताबाई (जन्म : आपेगाव, महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : मेहूण (जळगाव जिल्हा), इ.स. १२९७) या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाज्याची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे.
योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरू मानले. मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनान्ती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.
संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांनी रचिलेले ताटीचे अभंग हे त्यांच्या नावावर नोंदविलेले आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना काही बोध दिला आहे. त्या योगी चांगदेवांच्या गुरू होत्या. त्यांनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले आहे. ज्ञानदेव-भगिनी मुक्ताबाईचे मराठी संतमंडळातील स्थान अनन्यसाधारण आहे. सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेचा प्रतिकार करण्याचा ज्ञानदेवादी भावंडांतील बालयोगिनी मुक्ताबाई यांचा आध्यात्मिक अनुभव थोर होता. ज्ञानेश्वरादी भावंडांमधील अस्मिता, स्वाभिमान, प्रतिकार यांचे सजीव रूप मुक्ताबाई होय.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या भावंडांमध्ये मुक्ताबाई या सर्वात लहान होत्या. पोरवयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना स्वजातीयांनी संन्याशाची पोर म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली, पण हे सारे भोग सोसत ह्या चारही बहिण-भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली. आपल्यानंतर आपली मुलं तरी सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत रुक्मिणी यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायःश्चिताचा निर्णय शिरसावंद्य मान्य करून त्रिवेणी संगमात देहविसर्जन केले. मात्यापित्यांच्या या देहत्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. ती तितक्याच समर्थपणे तिने उचलली आणि पेलली. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या बालवयातच मुक्ताई प्रौढ गंभीर, सोशिक समंजस बनली. हळव्या निरागस वयात जीवनाच्या वास्तव सत्याकडे आणि कठोर स्वरूपाकडे निर्लीप्तपणे पाहण्याचे प्रगल्भ प्रौढत्व तिच्यात आलेले होते.
मुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. सर्व तत्कालीन संतांनी एकमुखाने मुक्ताबाईचा ज्ञानाधिकार मान्य केला. तिचा आदेश स्वीकारला. मुक्ताबाईचे गुरु म्हणजे तिचेच मोठे बंधू संत निवृत्तीनाथ ज्यांना मुक्ताबाईंनी गुरुमंत्र दिला ते म्हणजे विसोबा खेचर आणि हठयोगी चांगदेव हे होत. मुक्ताबाईंनी बालपणीच त्यांच्या समकालीन समाजाचे उग्र कठोर वास्तव अनुभवले आणि ते पचवून लौकिक जीवनसंघर्षाकडे पाठही फिरविली. त्यांच्या वाणीत सांसारिक सुखदुःखाचा वा क्लेश पीडांचा प्रतिसाद नाही.
सारे जीवनच त्यांनी अलौकिक रंगात रमवून टाकले आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांच्या संत मंडळीतील श्रेष्ठांनादेखील आपल्या आध्यात्मिक अधिकार बळावर स्पष्टोक्तीच्या सुरात जागविले आहे. याबाबतीत संत नामदेवांचा प्रसंग बोलका आहे. संत नामदेवराय हे विठ्ठलाचे परम भक्त, ते एकदा सहज ज्ञानदेवाच्या भावंडांना भेटले असता, निवृत्तीसह दोघाभावांनी नामदेवांना वंदन केले; परंतु नामदेवांनी मात्र त्यांना उलट नमस्कार केला नाही, तर ते ताठ बसून राहिले. मुक्ताबाईंनी मात्र नामदेवांचा हा अहंकार ओळखून त्यांना नमस्कार केला नाही, दर्शन घेतले नाही. उलट अधिकारवाणीने अत्यंत झणझणीत शब्दात तिने नामदेवाची कानउघाडणी केली.






