कोरोना आणि मुल

    (ॲड अनिशा फणसळकर)

    नमस्कार मित्रपरिवार ,
    सध्याच्या काळात कसे आहात ? _विचारू नये असे काही जणांचे मत आहे – कारण सगळेच भेदरलेले आणि अनिश्चिततेमुळे धास्तावलेले आहेत .. मी मात्र कसे आहात ? पेक्षा _जसे आहात तसे सक्षम होऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा असं म्हणेन .

    कोरोनामुळे प्रत्येक जण हवालदिल झाला आहे . त्यातच रोज नवनव्या बातम्या , कोरोना अपडेट व त्या अनुषंगाने भितिच्या उठणाऱ्या वावडया व हेतुतः पसरवले जाणारे किस्से ( खोटे ) ह्यामुळे सामान्य माणूस मनस्वास्थ्य गमावून बसतो आहे . मोठया माणसांची ही स्थिती आहे , आणि आता होऊ घातलेली तिसरी लाट लहानग्यांसाठी धोकादायक आहे हे ऐकून सर्वजण गर्भगळित झाले आहेत जणू .

    तसंही “लहान मूल आणि समस्या एकच आहे ” असा मोठयांचा दावा असतो , जो अगदी खोटा आहे .. लहान मूल समजून घेण्यात आपण कमी पडतो आणि मग त्याच सार खापर आपण मुलांवर काढतो …. ह्या विषयी पुन्हा कधीतरी . मात्र सदयस्थितीत , कोविड काळात व त्यातही येऊ घातलेल्या पुढील लाटेपूर्वी पालक म्हणून आपण सजग, सक्षम आणि पूर्णत्वाने तयारीत असणं गरजेच आहे .आपल्यावर कथांचा कायमच पगडा असतो , हो ना ? मग बघा बर आठवून -खऱ्या राक्षसापेक्षा भितीचा राक्षसच आपल्याला गिळंकृत करू पहात असतो ना . त्या भितीवर ताबा मिळवणं सहजगत्या नाही जमणार -पण अशक्य नक्कीच नाही .

    चला , प्रयत्न तर करू . प्रथमतः सजग होण्याचा- गेले वर्ष- दिडवर्ष आपण स्वतःच घाबरलेले मूल झालो आहोत– मग त्या मुलांनी कोणाकडे पहावे . आपण घरी बसून कंटाळलो -दमलो -पकलो आहोत _ हो ना . आपण मोठे आहोत तरी ही अवस्था तर लहान मूल किती हो कंटाळले असेल . खेळ नाही, मित्र नाही, शाळा नाही , मज्जा नाही . आधी ते समजून घेऊया . त्यांच्या खुर्चीत बसून मूल होऊन त्यांचे मन समजून घेऊया . सजगपणे त्यांच्या नजरेतुन बघुया . त्यासाठी डोळ्यावरील मोठेपणाचा ( नसलेल्या ) चष्मा बाजूला ठेवून मूल होऊन मुलांना समजून घेऊया .

    मुलांना सतत समज देण आणि समजून घेणं हयातला फरक आपण प्रथमतः समजून घेऊ . त्याकरिता स्वतःला सक्षम करूया .मानसिक व भावनिक दृष्ट्या आपण स्थिर राहून शरीरस्वास्थ्य जपण्याचा निश्चय करूया .जे आहे ते ,त्या स्थितीत स्विकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया . म्हणजेच आपल्याला पुढील काळात मुलांना शारिरिक , मानसिक व भावनिक दृष्टया सक्षम ठेवण्यात यश येईल .

    सजग आणि सक्षम होण्याबरोबरच येणाऱ्या सर्व अडचणींसाठी पूर्ण तयार असणे काळाची गरज बनली आहे . कोविड येण्यापूर्वीही आपल्या आयुष्यात अडचणी होत्याच ना ? त्यांना आपण तोंड देण्याचा प्रयत्न करत होतोच ना . मग आता सार्वत्रिक /जागतिक आलेल्या अडचणी एकत्र सोडवण्यासाठी सक्षम होऊन पूर्ण ताकदीने लढुया .

    पालक म्हणून कर्तव्य बजावताना , बालक होऊन समजून घेऊया, समजावूया, योग्य काळजी घेऊया, नियमांचे पालन करूया आणि सजग व सक्षमपणे कोरोनारूपी राक्षसाला न घाबरता , मुलांना विश्वासात घेऊन व त्यांच्यावर विश्वास ठेवून -कोरोना रूपी राक्षसाला तिलांजली देण्यासाठी सज्ज होऊया .चला तर मग . मुलांशी संवाद साधुया . त्यांना बळ देऊया . नवीन पिढी सबळ , ताकदवान आणि मानसिक दृष्टया सक्षम बनवण्याचा ”पण ” करूया .मी आहेच आपण येताय ना बरोबर .

    (लेखिका वकिल / समुपदेशक / ट्रेनर / मेडिएटर / सायकोथेरपिस्ट / लाईफ कोच आहेत.)

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here