लग्नाचे आमिष दाखवत डॉक्टरचे नर्सवर लैंगिक अत्याचार

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – लग्नाचे आमिष दाखवून सहा वर्षांपासून लैंगिक अत्याचार करून ऐनवेळेस लग्नास देऊन एका 35 वर्षांच्या नर्सची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित नर्सने दिलेल्या तक्रारीवरून माहीमच्या एका नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा रायपूर शहरात घडल्याने पुढील तपास तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

जावेद (नावात बदल) हा सध्या माहीम येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. 2014 साली तो छत्तीसगडमध्ये रायपूर शहरातील एका मेडीकल कॉलेजमध्ये पीजेचे शिक्षण घेत होता. याच कॉलेज परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या नर्ससोबत त्याची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. जावेदने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण लग्न करू, असे तो तिला सांगत होता. गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्यातील संबंध सुरू होते. चार वर्षांनी त्याला माहीम येथील एका हॉस्पिटलमध्ये नोकरी लागली. मात्र मुंबईत आल्यानंतरही त्यांच्यातील संबंध सुरू होते. अनेकदा पीडित महिला त्याला भेटण्यासाठी मुंबईत यायची. मुंबईत ती सांताक्रुझ येथील हॉटेलमध्ये राहायची. तिथेच त्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला होता.

त्यानंतर मात्र त्याने ती स्टाफ नर्स असल्याचे सांगून लग्नाला नकार दिला. तसेच तो तिला टाळू लागला. तिचे फोन घेणेही त्याने बंद केले. गुरुवारी (दि.3) ती त्याला जाब विचारण्यासाठी त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेली असता त्याने तिला भेटण्यास नकार दिला. त्याच्याकडून आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच तिने दुसर्‍या दिवशी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here