शिवराज्याभिषेकदिनानिमित्त किल्ले रायगड परिसराला छावणीचे स्‍वरूप

रायगड सोगावकर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४७ व्या राज्याभिषेक दिन उद्या (रविवार) मोजक्‍या लोकांच्या उपस्‍थितीत साजरा होत आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगड परिसराला छावणीचे स्‍वरूप आले आहे. नाते खिंडीपासून रायगड पोलिस दलासह शेजारील जिल्ह्यातील पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे आठशेपेक्षा जास्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कालपासूनच डेरेदाखल झाले आहेत.

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणावरून निर्माण झालेली परिस्‍थिती. त्‍यातच रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर गेल्या अनेक वर्षांप्रमाणे याही वर्षी शिवभक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने किल्ले रायगड परिसरात शिवभक्तांना येण्यास मनाई केली आहे. तसेच मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला आहे. दरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता केवळ पंचवीस जणांच्या उपस्थितीमध्ये राज्‍याभिषेकास उपस्‍थित राहणार असल्‍याचे घोषित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शिवभक्‍तांनी व राज्‍यातील नागरिकांनी आपल्‍या घरामध्येच शिवराज्‍याभिषेक सोहळा साजरा करावा असे आवाहन त्‍यांनी केले आहे.

दरम्‍यान प्रतिवर्षी शिवराज्‍याभिषेक सोहळ्याला शिवभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य शासनाने किल्ले रायगड परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. किल्ले रायगडावर जाण्यास शिवभक्तांना मनाई करण्यात आली आहे. माणगांवचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील यांच्याकडे किल्ले रायगड परिसराच्या बंदोबस्ताचे प्रभारीपद देण्यात आले असुन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ डीवायएसपी, पंधरा पीआय, साठ पीएसआय एपीआय, चारशे सत्त्याऐंशी पोलिस अंमलदार ,सहासष्ठ वाहतूक अंमलदार, एसआरपीएफची एक कंपनी, आरसीपी प्लाटून दोन कंपन्या, तसेच होमगार्ड एकशे चौऱ्याण्णव असे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती रायगड पोलिस नियंत्रण कक्षातून प्राप्त झाली आहे.

मागील काही वर्षांपासून किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा तारीख व तिथीनुसार संपन्न होत आहे. प्रतिवर्षी सहा जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यास तमाम महाराष्ट्रातून तसेच तिथीनुसार होणार्‍या सोहळ्यास देखील हजारो शिवभक्तांची असणारी उपस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनामार्फत या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त व अन्य सुविधा केल्या जातात. मात्र मागील वर्षीच्या कोरोना महामारीचे संकट चालू वर्षी देखील सुरू राहिल्याने शासनामार्फत किल्ले रायगडावर जाण्यास सध्या बंदी करण्यात आली आहे. केवळ पंचवीस शिवभक्तांनाच किल्ल्यावर जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनामार्फत देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here