अनैतिक संबधाला अडसर ठरलेल्या सासूचा खून; सून आणि नातवाला अटक

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – अनैतिक संबधाला अडसर ठरलेल्या सासूचा गळा आवळून ठार केलेल्या सून व नातवाला निलंगा पोलिसांनी तत्काळ अटक केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, निलंगा तालुक्यातील उमरगा (हाडगा)येथील ललिता शिवाजी माने हिने तिचा मुलगा गणेश शिवाजी माने याच्या सोबतीने दिनांक 4 जून रोजी दुपारी आपला पती निलंगा येथे गेला असताना घरामध्ये कोणी नसल्याचे बघून सासूला अचानक दोघांनी गळा आवळून जागीच ठार केले. त्यानंतर त्यांनी तिथून पोबारा केला.

ललिता ही पती व सासूपासून अनेक वर्षापासून दोघे वेगळे राहत होती. तसेच ललिताने आपल्या पतीला व सासूला मारहाण करण्याचे प्रकार अनेक वेळा केले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. ललिताचा पती हा पाटबंधारे विभागात शासकीय सेवेत आहे.ललिताचे पतीसोबतही वाद होते. त्याचा अर्धा पगार मिळावा यासाठी तिने कोर्टातही दाद मागितली आहे. तसेच त्याच्यावर जिवघेणे हल्ले ललिताने केले आहेत, अशी माहिती तिच्या पतीने दिली आहे.

माझ्या आईचा खून माझ्या पत्नीने व मुलाने केला आहे असा आरोप पती शिवाजी माने यांनी केला आहे. निलंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पंचनामा केला, तसेच शोध घेऊन आरोपी महिला व तिच्या मुलास अटक केली आहे. मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास निलंगा पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here