चंद्रपूर – प्रेयसीसोबत सतत वाद होत असल्याने एका प्रियकराने तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडीओ तयार केला. नंतर एका फेक फेसबुक अकाऊंटवरून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी प्रेयसीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. चंद्रपूरमधील बल्लारपूर शहरात ही घटना घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शिवाजी वार्ड येथे राहणारा सन्मुखसिंग बुंदेल (25) या तरुणाचे शहरातील एका 29 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या. मात्र काही दिवसांनी त्यांच्यात वाद होऊ लागले. दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. मनात सुडाची भावना निर्माण झाली. आणि प्रेयसीला धडा शिकवण्याचा मनात विचार केला. 1 जून रोजी फिरायला जायचे आहे म्हणून, त्याने प्रेयसीला जंगलात नेले. तिच्यावर बलात्कार केला. आणि या सर्व कुकर्माचे फोटो व व्हिडीओ तयार केले.
4 जूनला त्याच्या प्रेयसीचा वाढदिवस असतो. तिच्या वाढदिवशीच त्याने एका बनावट फेसबुक आयडीवरून ते फोटो व व्हिडीओ फेसबुकवर सर्वत्र व्हायरल केले. प्रियकराने केलेल्या प्रकाराची प्रेयसीला माहीती होताच तिने पोलीस स्टेशन गाठले आणि आपबीती सांगितली. पीडित फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी सन्मुखसिंग बुंदेल यांच्याविरोधात बलात्कार, ॲट्रॉसिटी, ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहेत. घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी राजा पवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकरे करीत आहेत.







