पुण्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या ‘या’ हॉटेलवर पोलिसांची धाड; 41 जणांवर गुन्हा दाखल

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं पुण्यात निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत. मात्र, नियम मोडत अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या एका हॉटेलवर पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी धाड टाकली आहे. यावेळी पोलिसांनी हॉटेल मालकासह एकूण 41 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विजय दुधाळे आणि शिंदे कात्रज परिसरात गस्त घालत होते. यावेळी मांगडेवाडी फाटा येथील साई गार्डन या हॉटेल समोरील पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी पार्क केल्या असल्याचं त्यांना दिसलं. यामुळे दुधाळे आणि शिंदे यांनी हॉटेलात प्रवेश केला. यावेळी हॉटेलमध्ये बरीच लोकं दारू पित असल्याचं त्यांना दिसलं. लगेच पोलीस अंमलदार दुधाळे यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ पोलिसांना दिली.

वरिष्ठ पोलिसांनी ताबडतोब पोलीस पथक पाठवून संबंधित हॉटेलवर छापा टाकला. याठिकाणी संचारबंदीचे नियम डावलून एकूण 39 जण एकत्र येऊन दारु पित बसले होते. संचारबंदीचे नियम मोडणे, एकत्र जमा होणे, अवैधरित्या दारु पिणे अशा वेगवेगळ्या गुन्हांतर्गत भारती विद्यापीठ पोलिसांनी हॉटेल मालकासह एकूण 41 जणांना अटक केली आहे.

दरम्यान, यावेळी पोलिसांनी 25 दुचाक्या, 1 रिक्षा, 1 कार आणि काही रोख रक्कम असा एकूण 7 लाख 5 हजार 740 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विजय दुधाळे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here