मुंबई – हर्षवर्धन जोशी या वसईतील 25 वर्षीय तरुणानं कोरोनावर मात केल्यानंतर जगातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर करण्याची कामगिरी केली आहे. काही दिवसांपुर्वी त्याला कोरोना झाला होता. त्यानंतर कोरोनावर मात करत त्यानं माऊंट एव्हरेस्टच्या दिशेनं पाऊल टाकलं.
6 एप्रिलपासून ते 23 मे पर्यंतच्या या काळात त्याने ही चढाई पुर्ण केली आहे. चढाई करत असताना त्याला कोरोनानं ग्रासलं. तेव्हा त्यानं स्वतःला बेस कॅम्पमध्ये आयसोलेट करून घेतलं. 8 दिवसानंतर तो कोरोनामुक्त झाला. त्यानंतर त्यानं एव्हरेस्टवर चढाई पुर्ण केली. या मोहिमेत त्याला 60 लाख रुपये खर्च आला आहे.
मूळचा महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नवघर माणिकपूर शहरांतील दिवाणमान येथील हर्षवर्धन जोशी (25) याने ऐन कोविड-19 च्या महामारीत ही धाडसी कामगिरी करुन दाखवत भारतमातेच्या झेंड्यासोबत वसई विरार शहर महानगरपालिकेचा झेंडा देखील त्यानं या माऊंट एव्हरेस्ट शिखरावर फडकविला. त्यामुळे, वसईचे नाव आता एव्हरेस्टवर लिहिले गेलं आहे.
हर्षवर्धन जोशी (25) हा आय टी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना व या मोहिमेत त्याला कोविडने ग्रासले असताना त्यावर ही मात करून त्याने ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील जीवघेणी मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. त्यानंतर वसईकरांनी व खास करून दिवाणमान गावातील लोकांनी त्याचे जंगी स्वागत केलं. सातोरी एडव्हेंचर एव्हरेस्ट अभियान यांच्यातर्फे मार्च 2021 मध्ये ही तीन सदस्य असलेली एव्हरेस्ट शिखर मोहीम राबवण्यात आली होती. यात अभियान निदेश प्रबंधक ऋषी भंडारी यांच्या सांगण्यानुसार, या तीन सदस्यांमध्ये हर्षवर्धन जोशी, नेपाळी फुर्ते शेरपा आणि अनुप राय यांचा समावेश होता.
माऊंट एव्हरेस्टवर चढायचं हे त्याचं जुनं स्वप्न होतं. यासाठी आर्थिक पाठबळही भरपूर प्रमाणात लागणार होतं. तरीही त्याने जिद्दीने यासाठी स्वतःची बचत केलेली काही रक्कम, मित्र, काही कंपनी, नातेवाईक तसेच वसई-विरार शहर महानगरपालिका यांनाही मदतीसाठी आवाहन केलं होतं. त्यावेळी वसई-विरार महानगरपालिका क्रीडा विभागाच्या वतीने त्यास चार लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली होती. त्यानंतर त्यांने अनेक अडचणीचा सामना करत हा कारनामा केला आहे. वसईतील हर्षवर्धन जोशी या तरुणाने कोरोनावर मात करून जगातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट’ सर करण्याची अविश्वसनीय कामगिरी बजावली आहे.






