भारतीय स्‍वातंत्र्यलढयात महत्त्वाचे योगदान देणारे आदिवासी जननायक बिरसा मुंडा

  birsa-munda

  (योगेश शुक्ल)
  भारतीय स्‍वातंत्र्यलढयात महत्त्वाचे योगदान देणारे आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांचा आज दि.९ जून स्मृतिदिवस. त्यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याविषयी…
  त्यांचा जन्म १५ नोव्‍हेंबर, १८७५ रोजी रांची जवळील लिहतू खेडेगावात सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्‍पत्‍याच्‍या पोटी झाला. याच बालकाने लढवय्या न्‍याय हक्‍कासाठी मोठा लढा उभारुन जे महान कार्य केले त्‍याला तोड नाही. त्‍यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा किताब जनतेनेच बहाल केला.
  त्‍यांचे वडील शेतमजूर होते. घरच्‍या गरीबीमुळे त्‍यांना इंग्रजी माध्‍यमाच्‍या चाईबासा इंग्लिश मिशनरी स्‍कूलमध्‍ये शिक्षणाची संधी मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे त्‍यांच्‍यावर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला परंतु त्‍यांना भारतीय संस्‍कृतीचा मनस्‍वी अभिमान होता व तो त्‍यांनी निरंतर जपला. नैतिक आचरणाची शुद्धता व एकेश्‍वरवादाचा त्‍यांनी पुरस्‍कार केला. ब्रिटिशांनी १८७८-७९ मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्‍या राजवटीमध्‍ये आदिवासींच्‍या वनसंपत्तीवर असलेल्‍या अधिकारावर बाधा येण्‍यास सुरुवात झाली. आदिवासींना यामुळे बेघर व्हावे लागले. आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी काही फळ, कंदमूळ, लाकुड्फाटे अथवा जनावरांसाठी चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली आणि आदिवासीयांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. हे रोखण्‍याकरीता आदिवासींनी न्‍यायालयात याचिका दाखल केली व आदिवासींचे वनाधिकार पुनर्स्‍थापित करण्‍याची मागणी केली परंतु सरकारने ती फेटाळल्‍यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला.

  सन १८९४ मध्‍ये बिहार राज्‍यात भीषण दुष्‍काळ पडला होता. या दुष्‍काळामध्‍ये उपासमारी व महामारीने अनेक लोक मृत पावले. त्‍यावेळी त्‍यांनी गरीब आदिवासी समाजाची निःस्‍वार्थी अंतःकरणाने सेवा केली. ब्रिटीश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करुन दुष्‍काळावर मात करण्‍याकरिता त्‍यांनी जनआंदोलन केले. हे आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्‍या शोषणाविरुद्ध होते. त्‍यामुळे सामाजिक संतुलन बिघडून अशांतता निर्माण होत असल्‍यामुळे ब्रिटिशांनी जहागिरदार व जमीनदारांच्‍या माध्‍यमातून बिरसा मुंडा यांना रोखण्‍याचा प्रयत्‍न केला. १८९५ मध्‍ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचा करावास झाला त्‍यांना हजारीबाग तुरुंगात पाठविले. त्‍यामुळे सरकारविरुद्ध असंतोष वाढत गेला व ब्रि‍टिश सत्ता उखडून टाकण्‍याचा संकल्‍प त्‍यांनी केला. दोन वर्षाचा सश्रम कारावास उपभोगून परत आल्‍यानंतर आदिवासींच्‍या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी राजकीय स्‍वातंत्र्याची आवश्यकता त्‍यांनी ओळखली. त्‍यासाठी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करण्‍यासाठी प्रयत्‍न करुन त्‍यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्‍वातंत्र्यलढा पुकारला.

  सन १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्‍या नेतृत्‍वाखाली आदिवासी समाजाने ब्रिटिश सरकारविरुद्ध अनेक लढाया करुन त्‍यांना जेरीस आणले. त्‍यांनी पारंपारिक शस्‍त्रांद्वारे म्‍हणजे धनुष्‍यबाण, भाले इत्‍यादींच्‍या साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढवले. ब्रिटिश सरकारकडे अत्‍याधुनिक शस्‍त्रास्‍त्रे होती. तरीदेखील १८९८ मध्‍ये तांगा नदीच्‍या काठावर बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशसैन्‍याला नामोहरम केले. नंतर अतिरिक्‍त कुमक आल्‍यामुळे ब्रिटिशांनी आदिवासी नेत्‍यांना रोखण्‍यात यश मिळवले. त्‍याप्रसंगी सुमारे ४०० आदिवासी शहीद झाले. यात बिरसा मुंडा यांचे योगदान मोठे होते. सन १९०० मध्‍ये बिरसा मुंडा डोमबाडी पहाडांमध्‍ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करीत असताना, ब्रिटिश सैन्‍याने हल्ला चढविला व त्‍या ठिकाणी भीषण लढाई झाली. त्‍यांना चक्रधरपूर येथे बंदी करुन रांची कारागृहात त्‍यांची रवानगी करण्‍यात आली. २० मे १९०० रोजी बिरसा मुंडा यांना एकांत कोठडीत ठेवले होते. बिरसा यांनी जेवण करणे नाकारले. त्याच दिवशी ते न्यायालयात बेशुध्द पडले. न्यायालयातून कारागृहात आणले. औषधोपचार सुरु केला. जेल अधिक्षक एंडरसनच्या औषधोपचाराने बिरसा यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत होती. सात जून पर्यंत बिरसा ठिक होते. मात्र दि. ९ जून १९०० रोजी बिरसाला रक्ताची उलटी झाली ते बेशुध्द पडले. त्यातच त्यांचा मृत्यु झाला. मृत्युचे कारण ‘एशियाटिक कॉलरा’ हे शासनाने दिले परंतु एकही लक्षण एशियाटिक कॉलराशी जुळत नव्हते. नेपोलियनला आर्सेनिक देवून जसे ठार मारण्यात आले तिच लक्षणे बिरसा मुंडा यांच्या शरीरावर दिसत होती. मुंडाच्या प्रथेनुसार त्यांना दफन करावयास पाहिजे होते परंतु कारागृहातच दफन करून मृत्युचा पुरावा नष्ट केला.
  बिरसाच्या आंदोलनामुळेच इ.स.१९०० मध्ये सरकारने छोटा नागपुर क्षेत्रात जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले तसेच बिरसा मुंडा यांच्यामुळे मुंडा आदिवासी शिक्षण, खेळ, विज्ञान, राजकारण अशा अनेक विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली.

  बिरसा मुंडा यांनी आपल्या नैसर्गिक हक्कासाठी संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष आदिवासींच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकिय बदलाची प्रक्रिया होती. बिरसा मुंडा यांनी बुध्द कधीच वाचला नाही पण बुध्दांची शिकवण त्यांच्या तत्वज्ञानात प्रखरतेने जाणवते. त्यांनी महात्मा फुले, कबीर वाचला नाही तरी सामाजिक, वैज्ञानिकतेचे ते प्रसारक होते. बिरसाचे प्रश्न समोर घेऊन ती प्रक्रिया समाज बदलासाठी लोकशाहीच्या धारणेवर जीवनशैली बनविली तो भारतीय क्रांतीची आधारभूमी आहे. समाज बदलाचा बिरसा मुंडा यांचा विद्रोह हा एक आदिवासींच्या पुर्ण स्वातंत्र्याचा विद्रोह होता.
  आपल्‍या २५ वर्षाच्‍या अल्‍पजीवन कालावधीमध्‍ये त्‍यांनी आदिवासींमध्‍ये स्‍वदेशी व भारतीय संस्‍कृतीच्‍या प्रती जी प्रेरणा जागवली ती अतुलनीय आहे. आजसुद्धा झारखंड, बिहार, ओरिसा, पिश्चिम बंगाल, मध्‍यप्रदेश मधील आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपले आदय दैवत मानतो. बिरसा मुंडा यांनी त्रिस्‍तरीय पद्धतीने समाजाच्‍या शोषणाचे मूळ, परकीय राजकीय व्‍यवस्‍थेत असल्‍याची बाब बिरसा मुंडा यांनी ओळखून त्‍याविरुद्ध आदिवासी समाजास संघटित करुन ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी आंदोलन पुकारले. आदिवासी समाजाचा आर्थिक स्‍तर उंचावण्‍यासाठी त्‍यांनी प्रचलित असलेल्‍या जमीनदारी व जहागिरदारी पद्धतीविरुद्ध लढा पुकारला.
  कुठलाही समाज किंवा देश प्रबोधनाशिवाय खऱ्या अर्थाने प्रगत तसेच क्रीयाशील होत नाही. याची जाणीव बिरसा मुंडा यांना त्‍या काळी होतीच. बिरसा मुंडेच्या विद्रोहामध्ये याच विचारधारेचा प्रभाव दिसून येतो. त्‍यामुळे शिक्षण, स्वच्‍छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर विशेष भर देऊन त्‍यांनी समाज प्रबोधन केले. याचाच परिणाम म्‍हणून आदिवासी जनजमातीने शिक्षण, स्‍वच्‍छता यांचा मोठ्या प्रमाणावर अंगीकार केला आहे.


  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here